महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्याची किंमत ६६ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:38+5:302021-09-07T04:35:38+5:30
हिंगोली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येते. मागील आठ महिन्यात अतिवेगाने वाहन ...

महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्याची किंमत ६६ लाख!
हिंगोली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येते. मागील आठ महिन्यात अतिवेगाने वाहन चालणारे ६ हजार ६०३ वाहन चालक आढळून आले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहने वाढली आहेत. शहरासह महामार्गावर ही वाहनांची वर्दळ असते. वेडीवाकडी वाहने चालवणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, वाहने सुसाट चालवणे आदी प्रकार घडत आहेत. याचा इतर नागरिकांना त्रास तर होतोच. शिवाय अपघाताला निमंत्रण मिळत आहे. महामार्गावर अतिवेगाने वाहन चालविल्याने अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस विभागाला इंटरसेप्टर कार देण्यात आली आहे. महामार्गावर सुसाट धावणाऱ्या वाहनांचा अचूक वेग मोजला जात असून जानेवारी ते ऑगस्ट या काळात ६ हजार ६०३ वाहने अतिवेगाने धावताना आढळून आले आहेत. वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यामुळे सुसाट वाहनाला ब्रेक लागला आहे.
महामार्गावर ८ महिन्यात ६६ लाख ३ हजारांचा दंड
अतिवेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड लावला जातो. या वर्षात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात इंटरसेप्टर कारच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ६ हजार ६०३ वाहनचालकांना ६६ लाख ३ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
धावत्या गाडीचा मोजला जातो वेग
वाहनाचा वेग मोजण्यासाठी जिल्ह्याला इंटरसेप्टर कार देण्यात आली आहे. या कारच्या माध्यमातून धावत्या वाहनाचा वेग मोजला जातो. अचूक वेग मोजला जात असल्याने अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
एसएमएसवर मिळते पावती
इंटरसेप्टर कारमधील कॅमेरा अतिवेगाने धावणाऱ्या वाहनाचा नंबर घेतो. त्यानंतर त्या वाहनाच्या मालकांच्या मोबाईल नंबरवर दंडात्मक कारवाईचा संदेश पाठविला जातो.