जिल्ह्यात ५६ मुले शाळाबाह्य आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:20+5:302021-03-26T04:29:20+5:30
हिंगोली : जिल्ह्यात १ ते १५ मार्चदरम्यान शाळाबाह्य मुले शोधमोहीम राबविण्यात आली होती. यात वसमत तालुका वगळता ५६ मुले ...

जिल्ह्यात ५६ मुले शाळाबाह्य आढळली
हिंगोली : जिल्ह्यात १ ते १५ मार्चदरम्यान शाळाबाह्य मुले शोधमोहीम राबविण्यात आली होती. यात वसमत तालुका वगळता ५६ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. इतर तालुक्यांनी याबाबतचा अहवाल सादर केला असताना वसमत तालुक्याने अद्याप अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविला नसल्याने सर्वेक्षणाबाबत साशंकता निर्माण होत आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यान्वये सर्व घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता शाळाबाह्य मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार १ ते १५ मार्चदरम्यान, जिल्हाभरात शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्थानक, बसस्थानक, वीटभट्टी, दगडखाणी, स्थलांतरित कुटुंबे, कलावंतांच्या वस्त्या, तेंदूपत्ता वेचणारी कुटुंबे, मागासवर्गीय कुटुंबे आदी ठिकाणी शिक्षक, कर्मचाऱ्यांनी जाऊन तेथील शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. याध्ये वसमत तालुका वगळता ५६ मुले शाळाबाह्य आढळली आहेत. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.
२१ मुली शाळाबाह्य
जिल्ह्यातील अनेक कुटुंबे कामानिमित्त इतर जिल्ह्यांत स्थलांतरित झाली आहेत. तसेच इतर जिल्ह्यांतील कुटुंबेही हिंगोली जिल्ह्यात आली आहेत. यावेळी शाळाबाह्य शोधमोहीम राबविली असता यात २१ मुली शाळाबाह्य असल्याचे आढळून आल्या आहेत, तर शाळाबाह्य मुलांची संख्या ३५ आहे.
५३०० कर्मचारी मोहिमेत
जिल्हाभरात संचारबंदीच्या काळातही जिवाची पर्वा न करता शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. कोरोना काळातही या मोहिमेत जवळपास ५ हजार ३०० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत सर्वेक्षण करण्याला प्राधान्य दिले. त्याच्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे.
कळमनुरी तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य
जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला असता यात औंढा तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे १० मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यानंतर सेनगाव तालुक्यात ११, हिंगोली तालुक्यात १६, तर कळमनुरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १९ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत.
तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी
सेनगाव - ११
हिंगोली - १६
कळमनुरी -१९
औंढा नागनाथ - १०
वसमत - अप्राप्त
अहवाल देण्यास चालढकल
जिल्हाभरात शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्यानंतर अहवाल शिक्षण विभागाकडे सादर केला जातो. त्यानुसार हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यांचा अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. मात्र, वसमत तालुक्याचा अहवाल २५ मार्चपर्यंतही सादर करण्यात आला नव्हता. जिल्हा शिक्षण विभागाने अहवाल वारंवार मागूनही दिला जात नसल्याने वसमत तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया...
कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाही शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांनी शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यास पुढाकार घेतला. त्यांच्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात यश आले आहे. शाळाबाह्य मुलांना शाळांत प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी