शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीने यंदाही अर्धवटच राहणार अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST2021-06-18T04:21:33+5:302021-06-18T04:21:33+5:30

हिंगोली जिल्ह्यात १४ जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन जि.प.कडून आखण्यात आले होते. शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती ग्राह्य धरून नियोजन ...

With 50 per cent attendance of teachers, the course will remain incomplete this year as well | शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीने यंदाही अर्धवटच राहणार अभ्यासक्रम

शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीने यंदाही अर्धवटच राहणार अभ्यासक्रम

हिंगोली जिल्ह्यात १४ जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन जि.प.कडून आखण्यात आले होते. शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती ग्राह्य धरून नियोजन केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातही कार्यालयीन उपस्थिती १०० टक्के केली होती. मात्र शिक्षण संचालकांनी ५० टक्के शिक्षक उपस्थितीचा फाॅर्म्युला सांगितला आहे. त्यामुळे याचा अध्यापनावर परिणाम होणार आहे. शिक्षक शाळेत असतील तरच ते ऑनलाइन वर्ग तरी घेतील किंवा त्यासाठीचे नियोजन तरी करतील. मात्र शाळेत नसताना त्यांचे वर्ग सुरू राहतील की नाही, याचा काही नेम नाही. शासन आदेशाचा अंमल तर खात्रीने होणार आहे. त्यात गेल्यावर्षीही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण नाही झाला की परीक्षाही झाल्या नाहीत. यंदाही तीच परिस्थिती राहण्याची शंका सुरुवातीलाच व्यक्त होत आहे. पालक मात्र आपल्या मुलांचे नुकसान होत असल्याने हैराण आहेत. मुले यापुढे शाळा विसरूनच जातील की काय? अशी उपहासात्मक खंत अनेकजण व्यक्त करताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील शाळा

१३५०

जि.प. शाळा

८८२

अनुदानित शाळा

२०८

विनाअनुदानित शाळा

२३५

शिक्षक

७२५०

शिक्षकेतर कर्मचारी

२७२५

काय होतोय परिणाम

जि.प.च्या शाळांत शिक्षकांची ५० टक्केच उपस्थिती असल्याने शालेय नियोजनानुसार ऑनलाइन वर्ग घेण्यात अडचणी येत आहेत. त्यात आज जे शिक्षक आपले विषय घेत आहेत, ते थेट एक दिवसाआड अभ्यासक्रम घेत आहेत. वर्ग शिक्षकांना दिवसभर एक वर्ग सांभाळण्याची स्थिती नाही. ऑनलाइनमुळे अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. त्यातच एक दिवसाआड शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचा किती भाग पूर्ण होईल, हे सांगणे अवघडच आहे.

अध्यापन बंधनकारकच

शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा दिली म्हणजे घरून वर्ग घ्यायचे नाहीत असे नाही. त्यांनी घरूनच ऑनलाइन वर्ग भरवायचा आहे. त्यामुळे या ५० टक्के उपस्थितीमुळे अभ्यासक्रमावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यासही शिक्षण विभागाने सांगितली आहे. त्याचे पालन कितपत होईल, याची तपासणी करणारी यंत्रणा मात्र नाही.

मुलांना मोबाइल मिळत नसल्याने शिक्षकही चिंतेत

शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीच्या मुद्यापेक्षा १०० टक्के मुले किंवा पालकांकडे अँड्राॅईड मोबाइल नाही, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. ऑनलाइन वर्ग घरूनही घेतले जात आहेत. मात्र प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे वेगळे नियोजन आवश्यक आहे.

रामदास कावरखे, शिक्षक

ग्रामीण मुलांना पालक मोबाइल देत नाहीत. काही ठिकाणी रेंज नाही. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनात मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीपेक्षा प्रत्यक्ष अध्यापनासह वर्ग भरणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी उपाय शोधला पाहिजे.

सुभाष जिरवणकर, शिक्षक

Web Title: With 50 per cent attendance of teachers, the course will remain incomplete this year as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.