जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या २६५ शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:02+5:302021-02-07T04:28:02+5:30

कळमनुरी : जिल्ह्यात व्यवस्थापनाच्या सर्व पाचवी ते आठवीच्या ६६८ शाळा असून ८३ हजार ६५१ विद्यार्थीसंख्या आहे. ...

265 schools from 5th to 8th started in the district | जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या २६५ शाळा सुरू

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या २६५ शाळा सुरू

कळमनुरी : जिल्ह्यात व्यवस्थापनाच्या सर्व पाचवी ते आठवीच्या ६६८ शाळा असून ८३ हजार ६५१ विद्यार्थीसंख्या आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या २६५ शाळा सुरू झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी दिली.

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याबाबत अजूनही १०० शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आलेले आहेत. येत्या सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर त्या शाळाही सुरू होणार आहेत. पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने यापूर्वी दिलेल्या आहेत. पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार नियम व अटीच्या अधीन राहून शाळा सुरू करण्यात येत आहेत.

कोरोनाच्या महामारीमुळे मागील मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. १८ जानेवारी रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी सूचित केले होते. या पत्राच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही शाळा सुरू करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शासन निर्णय १५ जून, २९ ऑगस्ट व १० नोव्हेंबर २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य स्वच्छता, वर्गखोल्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, सर्व शिक्षकांच्या कोरोनाबाबतच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, कार्यगट गठित करावे, शाळेत विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था करावी, शाळेत मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन व्हावे, यासाठी विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित कराव्यात, पालक संमतीपत्र व ग्रामपंचायतचा ठराव घेणे बंधनकारक आहे. वर्गखोल्या स्वच्छ व सॅनिटायझर कराव्यात या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर केला जात आहे.

शंभर टक्के शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्यानंतरच शाळेकडून शाळा सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे येत आहेत. शाळेतील सर्व शिक्षक निगेटिव्ह असल्यानंतर शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला जात आहे. कोरोना महामारीमुळे मागील मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. आता टप्प्याटप्प्याने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. कमी वेळेत सर्व अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा, या शिक्षकांसमोर पडलेल्या प्रश्नावर ज्यादा तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल, असेही काही शिक्षक सांगत आहेत.

यापूर्वी काही शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिलेले आहेत. ऑनलाइन धडे देण्यामागे अनेक समस्यांचा सामना शिक्षक व विद्यार्थ्यांना करावा लागला. काही शिक्षकांनी गावात जाऊनही विद्यार्थ्यांना अध्यापन केले आहे. आता शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थीही आनंदाने शाळेत जात आहेत. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, पालकांचे संमतीपत्र, सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्यात का, या सर्व माहितीसह शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या नियम व अटीच्या अधीन राहून जिल्ह्यातील २६५ शाळा सुरू झाल्या आहेत.

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली सूचना

येत्या सोमवारी १०० च्या जवळपास शाळा सुरू होणार असल्याचेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने या सर्व शाळा सुरू करण्यात येत आहेत. १९ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियम व अटीच्या अधीन राहून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना शाळांना दिल्या होत्या. कोरोनाचे भय अजूनही गेलेले नाही. कोरोनाचे रुग्ण अजूनही सापडतच आहेत. त्यामुळे सर्व शाळांनी कोरोनाबाबतच्या दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिलेल्या आहेत.

Web Title: 265 schools from 5th to 8th started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.