महिनाभरात २३ लाखांचा दंड ; तरीही नियमांना तिलांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:16+5:302021-03-28T04:28:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. ...

महिनाभरात २३ लाखांचा दंड ; तरीही नियमांना तिलांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. महिनाभरात ५ हजार १७२ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून २२ लाख ९६ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जवळपास २३ लाखांचा दंड लावूनही अनेक वाहनचालक नियमांना बगल देत वाहने चालवत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. तरीही अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत् आहे. वाहनांना नंबरप्लेट नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणे आदी प्रकार वाढत आहेत. यातून वाहतूक विस्कळीत होत होती. वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाभरात वाहतूक शाखा व पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात येत आहे. दिनांक २४ फेब्रुवारी ते २६ मार्च दरम्यानच्या काळात ५ हजार १७२ वाहनांनी अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. या वाहनचालकांकडून तब्बल २२ लाख ९६ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत झाली असली तरी अनेक वाहनचालक अजूनही वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे पाहावयास मिळत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होत असली, तरी बहुतांश वाहनचालकांना वाहतुकीचे नियम समजावेत, यासाठीही जनजागृती होणेही गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आठवेळा दिवसभरात लाखाच्या वर दंड
महिनाभरात तब्बल २२ लाख ९६ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल झाला. यात तब्बल आठवेळा दिवसभरात लाखाच्या वर रक्कम दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून मिळाली आहे. २६ फेब्रुवारी रोजी १ लाख १५ हजार ५०० रूपये, २ मार्च रोजी १ लाख १५ हजार, ९ मार्च रोजी १ लाख १४ हजार, ११ मार्च रोजी १ लाख ३२ हजार ६०० रूपये, १३ मार्च रोजी १ लाख ३९ हजार २०० रूपये, १७ मार्च रोजी १ लाख २६ हजार ७०० रूपये, १८ मार्च रोजी १ लाख ३३ हजार ३०० रूपये, २३ मार्च रोजी १ लाख ७५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.