शहरात २० हजार घरे; अंदाजे १० टक्के अनधिकृत नळधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:12+5:302021-02-08T04:26:12+5:30

अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणीप्रश्न कायम पेटलेला असल्याचे पाहायला मिळते. हिंगोलीत मात्र ही समस्या जाणवत नाही. एकेकाळी येथेही ही समस्या ...

20,000 houses in the city; Approximately 10% of unauthorized plumber | शहरात २० हजार घरे; अंदाजे १० टक्के अनधिकृत नळधारक

शहरात २० हजार घरे; अंदाजे १० टक्के अनधिकृत नळधारक

अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणीप्रश्न कायम पेटलेला असल्याचे पाहायला मिळते. हिंगोलीत मात्र ही समस्या जाणवत नाही. एकेकाळी येथेही ही समस्या कायम आवासून उभी राहायची. मात्र, नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे मागील आठ वर्षांपासून हा प्रश्न सुटला आहे. अनेक नवीन वसाहतींनाही या योजनेचे पाणी दिले आहे. काही भागात बोअरलाच मुबलक पाणी असल्याने नागरिक पालिकेच्या पाण्यावर अवलंबून नाहीत. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. मात्र, आगामी २५ वर्षांचा विचार करून ही योजना बनविलेली असल्याने दोन दिवसाआड शहराला पुरेसे पाणी वेळापत्रकाप्रमाणे मिळते. तशी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली योजना आहे. मात्र, वीजबिल व पाणीपट्टी वसुली याचा ताळमेळ बसविण्यासाठी दोन दिवसांआड पाणी दिले जाते.

हिंगोलीची योजना नवीन असल्याने गळतीचे प्रमाण कमी असले तरीही अनेक नागरिकांनी आपल्या घरासमोरच्या नळांना तोट्या लावल्या नसल्याने पाणी वाया जाण्याचे प्रकार जुन्या शहरासह अनेक नवीन वस्तीतही पाहायला मिळते. त्याचबरोबर काहींनी अनधिकृतरित्या जोडण्याही घेतल्या आहेत. त्यामुळे शहरात पाणीप्रश्न निर्माण होत नसला तरीही नगरपालिकेच्या कराची चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. ही योजना कायम अशीच सुरू राहण्यासाठी यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तसेच जोडणी देण्यासही अनेकदा विलंब होतो. त्यामुळे संबंधितांकडून अवैध जोडणीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचेही चित्र आहे. यात सुसूत्रता आणली तर ही वेळ टाळता येणार आहे.

२ हजार अनधिकृत नळ

हिंगोली शहरात जवळपास दोन ते अडीच हजार अनधिकृत नळ जोडण्या असण्याची शक्यता आहे. यासाठी दरवर्षी सर्वेक्षण करून त्या अधिकृत करण्याचे काम केले जाते.

पाणी गळतीला लगाम

हिंगोली शहरात नवीन पाणीपुरवठा योजना असल्याने आधीच पाणीगळती त्या प्रमाणात होत नाही. मात्र, एरवी कायम तपासणी करून पाणी गळती होणार नाही, यासाठी पथके नेमलेली आहेत. क्वचित प्रसंगी विकासकामामुळे गळती होते.

२ कोटींचा पाणीकर जनतेकडे थकला

हिंगोली शहरात पाणीपट्टी कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. यंदा ७५ लाख वसूल झाले असून, २ कोटी रुपये थकलेले आहेत.

नगरपालिकेच्या पथकांकडून वसुली मोहीम सुरू असून, यात दिरंगाई केल्यास नळजोडणी तोडण्यात येणार आहे.

हिंगोलीत पाणीपुरवठा योजना चांगल्या रितीने कार्यान्वित आहे. वेळापत्रकाप्रमाणे नागरिकांना पाणी मिळते. कोणी अवैध जोडणी केली असेल तर ती नियमित करून घ्यावी. अन्यथा कठोर कारवाई होईल. शिवाय वेळेत थकबाकी भरून नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य केले पाहिजे.

- डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, हिंगोली

Web Title: 20,000 houses in the city; Approximately 10% of unauthorized plumber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.