१७ लाखांची जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:14 IST2018-07-29T00:14:21+5:302018-07-29T00:14:37+5:30
आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये १६ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन घटनांमध्ये २२ अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ लाखांची जाळपोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये १६ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन घटनांमध्ये २२ अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाती फाटा येथे २७ जुलै रोजी दुपारी ८ ते १० अज्ञात लोकांनी ट्रक अडवून पेट्रोल टाकून पेटवून दिला. यात तो ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेप्रकरणी ट्रकचालक महमद ताहिर महमंद तय्यब (रा. कालखेडा ता. फेरोजपूर झरिका जि. मेवात हरियाणा) याच्या फिर्यादीवरून १० अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि ओमकांत चिंचोलकर करत आहेत. तर एरिगेशन कॅॅम्प येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागीय कार्यालय विभाग क्र. ४ मध्ये २७ जुलै रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या दरम्यान १० ते १२ अनोळखी व्यक्ती तोंडाला बांधून हातात तलवारी घेवून कार्यालयात अनाधिकृत घुसत कार्यालयाची तोडफोड केली. अभिलेख जाळले, काचा-फर्निचर तोडले, यात १ लाख ३० हजार रूपयांच्या शासकीय मालमततेचे नुकसान केले आहे.
याप्रकरणी गणेश गंगाराम काळदाते (कनिष्ठ लिपिक) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनेत १६ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार तानाजी चेरले करीत आहेत. हे अनोळखी हल्लेखोर कोण? याचा शोध लावण्याचे आव्हान बाळापूर पोलिसांपुढे उभे आहे.