जिल्ह्यातील १४ लघु तलाव अजूनही जोत्याखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:18+5:302021-07-08T04:20:18+5:30
हिंगोली : जिल्ह्यात सरासरी २५० मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यानंतरही १४ लघु तलाव जोत्याखालीच असून, १२ लघु तलावांतील जलसाठा २५ ...

जिल्ह्यातील १४ लघु तलाव अजूनही जोत्याखालीच
हिंगोली : जिल्ह्यात सरासरी २५० मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यानंतरही १४ लघु तलाव जोत्याखालीच असून, १२ लघु तलावांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आतच आहे, तर धरणांतील जलसाठा मात्र ५० टक्क्यांच्या आसपास आहे.
हिंगोली जिल्ह्यानजीकच्या तीन धरणांपैकी दोनमध्ये ५० टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे. यामध्ये येलदरी धरणात ५६.४२ टक्के जलसाठा आहे. या धरणात एकूण ५८१, तर उपयुक्त ४५६ दलघमी जलसाठा आहे. मागील वर्षी ५०५ दलघमी उपयुक्त साठा होता. हे प्रमाण ६२.३७ टक्के होते, तर सिद्धेश्वर धरणात यंदा १८४ दलघमी व उपयुक्त १४.८६ दलघमी जलसाठा आहे. हे प्रमाण १८.३५ टक्के आहे. गतवर्षी २९.७९ टक्के साठा होता. त्यामुळे यंदा या दोन्ही धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा कमी जलसाठा असल्याचे दिसून येत आहे. इसापूर धरणातही सध्या ७८७ दलघमी, तर उपयुक्त ४९२ दलघमी जलसाठा आहे. हे प्रमाण ४९ टक्के आहे. गतवर्षी याच काळात ४३ टक्के जलसाठा होता. त्यामुळे या धरणात मागच्या पेक्षा जास्त साठा दिसत आहे.
जिल्ह्यातील लघु तलावांतील साठा आतापर्यंत झालेल्या पावसात फारसा वाढला नाही. हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव, सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव, पूर्णा तालुक्यातील मरसूळ, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, काकडदाबा, केळी व कळमनुरी तालुक्यातील देवधरी हे तलाव जोत्याखाली आहेत, तर हिंगोली तालुक्यात सवड ४ टक्के, सेनगाव तालुक्यात घोडदरी १५ टक्के, ओंढा तालुक्यात वाळकी ७ टक्के, औंढा तालुक्यात औंढा २ टक्के, पुरजळ १ टक्का, वंजारवाडी १ टक्का, पिंपळदरी ६ टक्के, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी १६ टक्के, बोथी १० टक्के, दांडेगाव ५ टक्के, वसमत तालुक्यातील राजवाडी १९ टक्के, अशी १२ तलावांची स्थिती आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांत १५ टक्के साठा
सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यात व जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा बंधाऱ्यात सध्या साठा केला नाही. मात्र, हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथे २२ टक्के, तर परभणी तालुक्यातील रहाटी बंधाऱ्यात ३८ टक्के जलसाठा आहे. मोठ्या प्रकल्यांत ५२ टक्के, तर लघु प्रकल्पांत २.१ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी अनुक्रमे ५९.४१ व २२.७९ टक्के होता.
वरुणराजाची अवकृपा कायम
यंदा वरुणराजा सुरुवातीलाच प्रसन्न झाल्यासारखी परिस्थिती होती. रोज बरसणाऱ्या धो-धो पावसामुळे पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, आता पावसाने ढील दिली. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. ७ जून रोजी सकाळी ८ पूर्वीच्या २४ तासांत फक्त कळमनुरीत ४.५० मि.मी., तर वसमत तालुक्यात ०.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. आजपर्यंत जिल्ह्यात २९.६३ टक्के पर्जन्य झाले आहे. आजपर्यंत हिंगोली २५३ मि.मी., कळमनुरी २६३ मि.मी., वसमत २३८ मि.मी., औंढा २९२ मि.मी., सेनगाव २४२ मि.मी., अशी पावसाची नोंद झाली आहे.