हिंगोली जिल्ह्यात १२७ बसेसला ‘व्हीटीएस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:31+5:302021-01-13T05:18:31+5:30
हिंगोली : एस. टी. महामंडळाच्या हिंगोली, कळमनुरी आणि वसमत तिन्ही आगारांमध्ये एकूण १२७ बसेसला ‘व्हीटीएस’ प्रणाली बसविण्याचे ...

हिंगोली जिल्ह्यात १२७ बसेसला ‘व्हीटीएस’
हिंगोली : एस. टी. महामंडळाच्या हिंगोली, कळमनुरी आणि वसमत तिन्ही आगारांमध्ये एकूण १२७ बसेसला ‘व्हीटीएस’ प्रणाली बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच प्रवाशांना बसचे ‘लोकेशन’ कळणार असल्याची माहिती हिंगोलीचे सहायक कार्यशाळा अधीक्षक सिद्धार्थ आझादे व कामगार सेनेचे विभागीय सचिव दिगंबर दराडे यांनी दिली.
बस कुठे? किती वेळात येईल हे सर्व एका ‘क्लिक’ वर प्रवाशांना पाहता येणार आहे. या संबंधीची यंत्रणा महामंडळाने सज्ज केली आहे. काही दिवसांतच एस. टी. महामंडळास बस ॲपवर ट्रॅक करता येणार असल्याचे आझादे यांनी सांगितले. रोसमेट्रा या कंपनीने मागील दोन महिन्यांपूर्वी हिंगोली आगारातील ५७ , कळमनुरी ३० आणि वसमत आगारातील ४० बसेसला व्हीटीएस बसविले आहे. सध्यातरी ही सेवा आगारातील अधिकारी-कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने प्रवाशांच्या सोयीकरीता ‘व्हेकल ट्रॅकींग सीस्टीम’ (एमएसआरटीसी काॅम्प्युटर ॲप) हे नवीन ॲप तयार केले असून रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एस. टी. महामंडळही ॲपवर प्रवाशांसाठी माहिती उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळे प्रवाशांना सोयीचे होणार आहे. हे ॲप जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) या यंत्रणेवर काम करीत असल्याने प्रवाशांना जवळची बसस्थानके, त्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या बसेस, बस कुठे आहे, चालक कुठे आहे, बस किती वेगाने धावत आहे, बस कितीवेळापासून थांबून आहे, बसचा पुढील स्टाॅप कोणता आहे, बसचा क्रमांक काय आहे, बसचा मार्ग कोणता आहे हे सर्वकाही पाहता येणार आहे.
प्रवाशांना लवकरच दिली जाणार माहिती
एस. टी. महामंडळाच्यावतीने व्हीटीएस बसविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हिंगोली आगाराने ५७ बसेसला व्हीटीएस बसविले आहे. यामध्ये शिवशाही, एशियाड, साध्या बसेसचा समावेश आहे. एवढेच नाही तर मालवाहू बसेसलाही व्हीटीएस बसविले गेले आहे. व्हीटीएस बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना त्याची माहिती दिली जाणार आहे.
-प्रेमचंद्र चौतमल, आगारप्रमुख, हिंगोली.