नाकाबंदीत १२ वाहने आढळली संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:34 IST2021-09-12T04:34:02+5:302021-09-12T04:34:02+5:30
हिंगोली : येथील नांदेड रोडवरील बिरसा मुंडा चौकात पोलिसांनी शनिवारी अचानक वाहनांची तपासणी मोहीम राबविली. यात जवळपास ४० वाहनांची ...

नाकाबंदीत १२ वाहने आढळली संशयित
हिंगोली : येथील नांदेड रोडवरील बिरसा मुंडा चौकात पोलिसांनी शनिवारी अचानक वाहनांची तपासणी मोहीम राबविली. यात जवळपास ४० वाहनांची तपासणी करण्यात आली असून १० ते १२ वाहने संशयित वाहने आढळली. विशेष म्हणजे एका दुचाकीला चारचाकी वाहनाचा नंबर आढळून आला.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही लोकांना जिल्हा हद्दपार करण्यात आले. ११ सप्टेंबर रोजीही सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या पथकाने नांदेड रोडवरील बिरसा मुंडा चौकात अचानक वाहनांची तपासणी सुरू केली. एक ते दीड तासाच्या कालावधीत जवळपास ४० वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी अचानक तपासणी सुरू केल्याने वाहनचालक चांगलेच कोंडीत सापडले. यावेळी कागदपत्रांची तपासणी केली असता यात १० ते १२ वाहने संशयित आढळली. विशेष म्हणजे यात एका वाहनाला चक्क चार चाकी वाहनाची नंबर प्लेट बसविलेली आढळली. तर काही वाहनाला नंबरप्लेट उलटी बसविणे, कागदपत्रे व्यवस्थित नसल्याचे दिसून आले. या पथकात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक राखोंडे, वाघमारे तसेच शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कारवाईमुळे वाहनचालकांना चांगलाच जरब बसला आहे.