तुमच्या मुलांचे बालपण अकालीच खुरटून जाऊ नये, म्हणून.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 07:05 AM2024-04-15T07:05:56+5:302024-04-15T07:06:14+5:30

कोविड-१९च्या महासाथीमध्ये मुले-मुली लवकर वयात येण्याचे प्रमाण वाढले होते. सध्याच्या काळात ही लक्षणे अधिक दिसतात, त्याकडे पालकांचे बारीक लक्ष हवे !

Your children's childhood should not end prematurely | तुमच्या मुलांचे बालपण अकालीच खुरटून जाऊ नये, म्हणून.. 

तुमच्या मुलांचे बालपण अकालीच खुरटून जाऊ नये, म्हणून.. 

डॉ. वामन खालीडकर, हार्मोन्स व बालरोगतज्ज्ञ, जहांगीर हॉस्पिटल, पुणे

अलीकडच्या काळात लहान मुलांमध्ये लवकर वयात येण्याचे प्रमाण अधिक दिसून येते आहे. वयात येण्याची क्रिया सुरू होण्याचे कमीतकमी वय मुलींमध्ये आठ वर्षांनंतर व मुलांमध्ये नऊ वर्षांनंतर असते. त्याआधी वयात येण्याच्या खुणा दिसणे हे अस्वाभाविक समजले जाते, म्हणजेच अकाली आलेली पौगंडावस्था ! मुलींची मासिक पाळी तेरा-पंधराव्या वर्षी सुरू होत असे, ती आता अकराव्या वर्षीच सुरू होते. मुलांमध्येसुद्धा आवाज फुटणे, दाढी-मिशा उगवणे या क्रिया चौदा-पंधराव्या वर्षीच दिसून येतात.

मुलींमध्ये आठ वर्षांच्या आधी आणि मुलांमध्ये नऊ वर्षांच्या आधी हार्मोन सक्रिय झालेले नसतात. या वयानंतर मेंदूकडून हळूहळू त्यांना जागृती दिली जाते, त्याबरोबरच शारीरिक व मानसिक बदल होऊ लागतात. ही क्रिया चालू झाल्यापासून पूर्णत्वाला येण्यापर्यंत तीन ते चार वर्षांचा कालावधी जातो. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा कालावधी निराळा असतो व दीड वर्षापासून ते चार वर्षांपर्यंत हा काळ टिकू शकतो. मुलींच्या बाबतीत मासिक पाळी सुरू होणे व मुलांच्या बाबतीत आवाज फुटून दाढी-मिशा उगवणे ही वयात येण्याच्या क्रियेची शेवटची स्थिती समजली जाते. या स्थितीनंतर शारीरिक वाढ व उंची साधारणपणे वर्ष ते दीड वर्षात वाढण्याची संपूर्ण थांबते.

कोविड-१९ या महासाथीच्या वेळी अचानक लॉकडाऊन चालू झाले आणि सारी माणसे घरात कोंडली गेली. या काळामध्ये मुले आणि मुली लवकर वयात येत आहेत. या काळजीने पालक डॉक्टरांकडे जास्त प्रमाणात येऊ लागले. सुरुवातीला समज होता, की लॉकडाऊनमुळे पालक घरीच आहेत आणि मुलांकडे त्यांचे बारीक लक्ष असावे. एरवी सहज दुर्लक्ष झाले असते, असे बदल, खुणा आता त्यांना (उगीचच) त्रास देऊ लागल्या आहेत. त्यानंतर जहांगीर हॉस्पिटलच्या रिसर्च सेंटरमध्ये या प्रश्नाच्या सखोल अभ्यासाची आम्ही सुरुवात केली. या अभ्यासाचे निष्कर्ष सांगणारा शोधनिबंध इंटरनॅशनल जर्नल ऑफ पेडियाट्रिक एन्डोक्रायनालॉजीमध्ये प्रसिद्धही झाला.

या अभ्यासाचा निष्कर्ष असा, की कोविड-१९च्या काळामध्ये मुले-मुली लवकर वयात येण्याचे प्रमाण खरोखरीच वाढले होते. त्यामागे अनेक कारणे होती. एक तर मुले सतत घरी बसून होती, त्यांना खेळायला सोडले जात नव्हते, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सातत्याने वापर केला जात होता आणि घरीच असल्यामुळे खाणे जास्त होऊन अनेक मुलांमध्ये स्थुलतेचे प्रमाण प्रचंड वाढले होते. विविध मार्गांनी आपल्या आयुष्यात शिरलेली कीटकनाशके तसेच कोविड-१९च्या काळात झालेला सॅनिटायझरचा प्रचंड वापर यामुळेही हार्मोन्स असंतुलित करणारी रसायने प्रचंड मोठ्या मात्रेने मुला-मुलींमध्ये आली आणि त्याचा संबंध अकाली पौगंडावस्थेशी असल्याचे आमच्या अभ्यासात आढळले. या निरीक्षणांना जगभरातील अनेक देशांमधून पाठिंबा मिळाला. कुक्कुटपालन व्यवसायात कोंबड्या किंवा दुग्ध उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या पशुखाद्यतले घटक, गायी-म्हशींना दिली जाणारी हार्मोनची इंजेक्शने यांचा मानवी आहारातील घटकांवर जो परिणाम होतो, त्यामुळेही लवकर वयात येण्याची प्रक्रिया सुरू व्हायला मदत होते. मुलांच्या बाबतीत मेंदूचे विकार उदाहरणार्थ ट्यूमर किंवा हायड्रोकॅफलस अशा तऱ्हेचे आजार जास्त प्रमाणामध्ये दिसतात.

अकाली पौगंडावस्थेत मानसिक तयारी, परिपक्वता नसताना अचानक होणाऱ्या शारीरिक बदलांना स्वीकारणे मुलांना झेपत नाही. त्यामुळे मानसिक चलबिचल, चिडचिड, विनाकारण रडारड हे सारं अति लवकर वयात दिसू लागतं. शिवाय वय कमी असताना उंची अचानक भरभर वाढते आणि अचानक थांबून जाते. त्यामुळे मुलांवर एकूणच विपरित परिणाम होतात. या सगळ्यांची मोठी मानसिक किंमत मुलामुलींना चुकवावी लागते आणि त्या लढाईत सापडलेल्या मुलांना पालकांचा आधारही अभावानेच मिळतो.

अकाली पौगंडाचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या उपलब्ध आहेत. पेडियाट्रिक एन्डोक्रायनॉलॉजिस्ट हे निदान करतात. अकाली पौगंडावस्था आलेल्या सर्वच मुलांना काही विशेष उपचारांची गरज लागत नाही. मात्र, हे बदल फारच लवकर सुरू झाले असतील आणि बदलांचा वेगही जास्त असेल, तर यावर औषधोपचार उपलब्ध आहेत आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरीचे आहे. मुलगी अकरा वर्षांची होईपर्यंत, मुले तेरा-चौदा वर्षांचे होईपर्यंत हे उपचार चालू ठेवावे लागतात. त्यामुळे मुलांचे बालपण अकाली खुरटण्याचा धोका टाळता येतो.

Web Title: Your children's childhood should not end prematurely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.