काय म्हणता, हालचाली मंदावल्यात?
By Admin | Updated: July 4, 2017 17:39 IST2017-07-04T17:39:38+5:302017-07-04T17:39:38+5:30
..मग मोठ्या आजाराची ही सुरुवात असू शकते. आजी-आजोबांकडे जरा जास्त लक्ष द्या..

काय म्हणता, हालचाली मंदावल्यात?
- मयूर पठाडे
तुमची आजी, आजोबा.. एवढं वय झालं, पण अजूनही धडधाकट आहेत की नाहीत?.. रोज सगळी कामं वेळच्या वेळी आणि स्वत:ची स्वत: करतात, रोज सकाळी फिरायला जातात, नातवंडं, पतवंडांसोबत छान खेळतात.. मुलांनाही त्यांची सोबत फारच आवडते.. आजी-आजोबांशिवाय त्यांनाही बिलकुल करमत नाही.. आजी-आजोबांचं हे चैतन्य घरभर कसं विखुरलेलं असतं आणि आपल्यालाही ते प्रफुल्लित करीत असतं..
पण थांबा, तुम्हाला आजकाल असं वाटायला लागलंय का, कि आजी-आजोबांचा चालण्याचा वेग किंचित मंदावलाय, पूर्वीच्या तुलनेत अलीकडे ते थोडं हळूहळू चालायला लागलेत..
तुम्हाला जर असं वाटत असेल, तर शंकेला जागा आहे. त्यांना ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.. कारण या वयात तुमच्या हालचाली अगदी थोड्या का मंदावलेल्या असेना, स्मृतीभ्रंशाकडे तुमची वाटचाल सुरू झालेली असू शकते. डिमेन्शिया, अल्झायमर.. यासारख्या आजारांची ती सुरूवात असू शकते.
अर्थात वयोमानानुसार तुमचे मसल्स कमजोर होणे, गुडघेदुखी, डायबेटिस, हृदयरोगासारखे वेगवेगळे आजार.. यामुळेही तुमच्या हालचालींवर मर्यादा येऊ शकतात, पण या साऱ्या गोष्टींकडे जर वेळीच लक्ष दिलं, तर नंतरच्या मोठ्या संकटातून आपली सुटका होऊ शकते, एवढं नक्की!
त्यामुळे आपल्या हालचाली जर थोड्याही मंदावल्या असतील तर त्याकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका, वेळीच त्यावर उपचार करा आणि कायम हसते-फिरते, आनंदी राहा. आपल्या चैतन्याचा सुगंध कायम सगळीकडे पसरू द्या..