नुसत्या चालण्यानं जळतील तुमच्या पाचशे कॅलरीज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 17:40 IST2017-11-22T17:37:07+5:302017-11-22T17:40:14+5:30
पण रोजचं चालण्याचं आपलं टार्गेट कसं पूर्ण करणार?

नुसत्या चालण्यानं जळतील तुमच्या पाचशे कॅलरीज!
- मयूर पठाडे
रोज तुम्ही किती अंतर चालता? अर्थातच तुम्ही ते मोजलं नसेल. पण ते मोजायला हवं. संशोधक सांगतात, सामान्य माणसानं दिवसभरात दहा हजार पावलं तरी चाललं पाहिजे. पण कसं मोजायचं हे? त्यासाठी पावलं मोजणं हे तसं कंटाळवाणंच. पण त्यानं तुमच्या उत्साहात आणि कार्यक्षमतेत नक्कीच फरक पडेल.
समजा तुमचं वय ४५ वर्षे आहे आणि वजन ७० किलो. तुम्ही जर ताशी तीन ते पाच मैल या वेगानं चालत असाल तर दहा हजार पावलं चालल्यानंतर तुमच्या जवळपास चारशे ते पाचशे कॅलरी जळतील. पण झटपट बारीक होणं, वेट लॉस करणं हे जर तुमचं ध्येय असेल तर मात्र तुम्ही किती कॅलरी रोज खाता आणि किती बर्न करता याचा रेश्योही तपासून पाहावा लागेल आणि त्याप्रमाणात आपल्या चालण्याची तीव्रता वाढवावी लागेल.
दहा हजार पावलं चालायची असं म्हटलं तर अनेकांना धसका बसेल, पण त्याची सुरुवात हळूहळूच करायला हवी. आपण किती अंतर चाललो हे सांगणारे अनेक अॅप्स सध्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतात. एमपीथ्री प्लेअर्समध्येही त्याचा उपयोग हल्ली करतात. काही शूजमध्येही अलीकडे हे तंत्रज्ञान आलेलं आहे. तुमचे शूजच सांगतील तुम्हाला, तुम्ही किती अंतर चाललात ते. त्यापेक्षा आणखी सोपा मागे म्हणजे थेट पेडोमीटरच खरेदी करायचं. त्यासाठी थोडे पैसे जातील, पण तुमचे हे पैसे वसूलही होतील. त्यातली गंमत तुम्हाला कळली की तुम्ह्ी आपोआपच आपल्या चालण्याचा लेखाजोखा ठेवायला लागाल आणि त्याप्रमाणे आपलं टार्गेट पूर्ण करायचाही प्रयत्न कराल.
हे टार्गेट कसं पूर्ण करायचं, त्यासाठीच्या या आणखी काही छोट्या टीप्स..
आपल्या मोबाईलमध्ये त्यासाठी रिमायंडर लावा. आपल्य मित्रांना सोबत घ्या. जे अगोदरच असं काही करताहेत त्यांच्यात जॉइन व्हा. दहा हजार पावलं आपल्याला चालायची आहेत हे डोक्यातून काढून टाका आणि निसर्गाचा आस्वाद घेत चालत राहा. तुमचं टार्गेट कधी पूर्ण होईल ते तुमचं तुम्हालाही कळणार नाही..