विदर्भ- गडचिरोलीत डॉक्टरांची ३३ पदे रिक्त

By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:59+5:302015-02-13T23:10:59+5:30

गडचिरोलीत डॉक्टरांची ३३ पदे रिक्त

Vidarbha: 33 posts of doctors in Gadchiroli vacant | विदर्भ- गडचिरोलीत डॉक्टरांची ३३ पदे रिक्त

विदर्भ- गडचिरोलीत डॉक्टरांची ३३ पदे रिक्त

चिरोलीत डॉक्टरांची ३३ पदे रिक्त

नियुक्तीवर येण्यास नकार : आरोग्य सेवेकडे शासनाचेही दुर्लक्ष

गडचिरोली : कुपोषण, मातामृत्यू, नवजात बालकांचे मृत्यू आदी समस्यांनी सदैव ग्रस्त राहणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३३ पदे रिक्त असल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर काम करीत आहे. मुंबई, पुणे व राज्याच्या इतर भागातून नियुक्त वैद्यकीय अधिकारी गडचिरोलीत येण्यास नकार देत असल्याने रिक्त पदांचा हा प्रश्न मागील चार-पाच वर्षांपासून कायम आहे.
राज्यातील अत्यंत मागास अशा या जिल्ह्यात शासनाच्याच आरोग्य सेवेवर नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेमार्फत ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, साडेतीनशे आरोग्य उपकेंद्र तर राज्य शासनाकडून गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रूग्णालय, आरमोरी, कुरखेडा, अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय तर उर्वरित आठ तालुक्यांमध्ये ग्रामीण रूग्णालये चालविल्या जातात.
जिल्हा व तालुकास्तरावरील जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १८ व वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १५ अशी एकूण ३३ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १३ कार्यरत असून १८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये सर्वाधिक जिल्हा सामान्य रूग्णालयातील ११ पदांचा समावेश आहे. चामोर्शी, धानोरा, आष्टी, मुलचेरा, सिरोंचा, कोरची व भामरागड आदी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची पदे रिक्त आहेत.
जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयाचे मिळून वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ८० पदे मंजूर आहेत. यापैकी ६५ पदे भरण्यात आली असून अनेक वर्षांपासून १५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये अहेरी उपजिल्हा रूग्णालय तीन, आरमोरी उपजिल्हा रूग्णालय एक, कुरखेडा उपजिल्हा रूग्णालय एक, ग्रामीण रूग्णालय सिरोंचा येथील दोन, चामोर्शी ग्रामीण रूग्णालयातील एक, एटापल्ली ग्रामीण रूग्णालय दोन, तसेच आष्टी व कोरची ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. मुलचेरा, देसाईगंज व भामरागड या तीन ग्रामीण रूग्णालयात वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

बॉक्स
दोन डॉक्टर देतात प्रत्येकी १५ दिवस सेवा
दुर्गम व अतिदुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये जिल्हा परिषदेकडून दोन डॉक्टर नियुक्त केले असले तरी ते आळीपाळीने १५-१५ दिवस आरोग्य सेवा देत असतात. त्यामुळे आरोग्य केंद्रात नेहमीच एकच डॉक्टर उपस्थित दिसतो. काही रूग्णालयात वैद्यकीय कर्मचारीच डॉक्टरांचे काम सांभाळून नेतात.

बॉक्स
जिल्हा सामान्य रूग्णालयातही तज्ज्ञांचा अभाव
गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रसुतीचे काम अनेकदा पुरूष डॉक्टरलाच करावे लागते. महिला डॉक्टरांचा अभाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने येथून सरळ पेशंट चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर येथे पाठविले जातात. बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या शिक्षणावर शासन पाच लाख रूपयांचा खर्च करते. मात्र ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी हे अधिकारी येत नसल्याने प्रत्येक तालुका रूग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.

Web Title: Vidarbha: 33 posts of doctors in Gadchiroli vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.