(Image Credit : Daily Mail)
बायकोने कितीही आरडा-ओरड करू द्या किंवा मुलांनी कितीही बाबा...बाबा...करू द्या मोबाइलमधून डोकं काही कुणी बाहेर काढायला तयार नसतं. मोबाइल आपल्या आयुष्यात लोकांपेक्षाही महत्वाचा झाला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाइल दिसतो. काही मिनिटांपेक्षा जास्त लोक मोबाइल त्यांच्यापासून दूर ठेवत नाही. इतकेच काय तर टॉयलेटमध्येही अनेकजण मोबाइल घेऊन जातात आणि तिथे बसल्या-बसल्या फोनचा वापर करतात. हे सगळं कशासाठी तर टाइमपाससाठी. पण टाइमपास तुम्हाला चांगला महागात पडू शकतो.
किती टक्के लोक टॉयलेटमध्ये मोबाइल वापरत असतील बरं?
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जे लोक कमोडर बसून मोबाइलचा वापर करतात, त्यांना पाइल्स होण्याचा धोका अधिक असतो. याबाबत ब्रिटनमध्ये नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. ज्यात सांगण्यात आलं की, ५७ टक्के लोक असे आहेत जे कमोडवर बसून मोबाइलचा वापर करतात. तर यातील ८ टक्के लोक हे नियमितपणे कमोडवर बसून मोबाइलचा वापर करतात. यावर डॉक्टरांना आढळलं की, जे लोक कमोडवर बसून मोबाइलचा वापर करतात, त्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या आहेत. सोबतच पाइल्ससारखा गंभीर आजार होण्याचाही त्यांना धोका असतो.
जास्त वेळ कमोडवर बसल्याने नसांवर पडतं प्रेशर
एका वेबसाईटसोबत बोलताना ब्रिटनचे डॉ. साराह जर्विस यांनी सांगितले की, तुम्ही किती उशीरापर्यंत कमोडवर बसून राहता, त्यानुसार तुम्हाला पाइल्स होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. तुम्ही टॉयलेटमध्ये जेवढा जास्त फोनचा वापर कराल, तेवढा जास्त वेळ तुम्ही कमोडवर बसाल. ज्याने ऐनस आणि लोअर रेक्टमच्या मांसपेशीं आणि नसांवर प्रेशर वाढू लागतं. यानेच तुम्हाला पाइल्सचा धोका अधिक राहतो.
कमोडवर बसून फोन वापरल्याने पाइल्सचा धोका
आतापर्यंत शौच येण्यासाठी जोर लावल्याने पाइल्सची तक्रार होत होती. तसेच गर्भवती महिलांना, सतत खोकला, कफ असणाऱ्यांना आणि वयोवृद्ध लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळत होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये आढळलं की, जे लोक कमोडवर बसून मोबाइलचा अधिक वापर करतात, त्यांनाही पाइल्सची समस्या होत आहे.
पाइल्स टाळायचा असेल तर....
आहारात फायबरचं प्रमाण वाढवा, पाणी जास्तीत जास्त सेवन करा, रोज नियमित एक्सरसाइज करा. तसेच टॉयलेटला जाताना फोन बाहेरच ठेवा. कमोडवर बसून फोनचा वापर करू नये.