शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

युद्धाच्या दृश्यांचा भार मनावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 09:48 IST

मानसिक तणाव आणखी वाढू शकतो.

डॉ. शुभांगी पारकर, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

आजच्या डिजिटल युगात युद्ध केवळ रणांगणावर लढलं जात नाही, तर ते आपल्या मोबाइल आणि टीव्हीच्या स्क्रीनवर सतत दिसत राहतं. न्यूज चॅनेल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि इन्स्टंट मेसेजिंग अॅप्समधून युद्धाच्या थेट दृश्यांचा भडिमार होतो. उद्ध्वस्त शहरे, रक्ताने माखलेली शरीरं, रडणारी लहान मुलं आणि आसवं गाळणाऱ्या नागरिकांची दृश्यं आपल्या मेंदूत खोलवर ठसतात. या दृश्यांचा परिणाम फक्त माहितीपुरता राहत नाही, तर तो आपली मनःस्थिती, भावभावना आणि वर्तनही बदलतो. माध्यमे युद्धाभोवतीचे कथानक घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे युद्धाच्या वास्तवाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो, ज्याद्वारे सामान्य जनता संघर्ष समजून घेते. मात्र, अनेकदा माध्यमांमधील सादरीकरण अतिरंजित हिंसेवर केंद्रित असतं. यामुळे मानसिक तणाव आणखी वाढू शकतो.

मानसिक परिणामः दृश्यमानतेचा अंतर्मनावर घाव

युद्धाच्या ग्राफिक कव्हरेजचे सततचे प्रदर्शन आपल्या संवेदना बधीर करू शकते, ज्यामुळे इतरांच्या दुःखाबद्दल सहानुभूती व्यक्त करणे कठीण होते. सहानुभूतीच्या या क्षीणतेचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, कारण ते युद्धामुळे प्रभावित झालेल्यांच्या मानवी अनुभवांशी जोडण्याची आपली क्षमता कमी करते. वारंवार युद्धाच्या दृश्यांचा अनुभव घेतल्यामुळे काही लोकांमध्ये भावनाशून्यता निर्माण होते. जिथे एकेकाळी आपण अशा दृश्यांवर हेलावून जायचो, तिथे आता आपण निष्प्रभ होतो. हिंसा आपल्याला 'सामान्य' वाटू लागते आणि हीच भावनाशून्यता सहवेदनाशक्ती कमी करते. हे फार धोकादायक आहे, कारण ते आपल्याला इतरांच्या वेदना समजून घेण्यापासून रोखू शकतं. जरी आपण थेट युद्धात नसतो, तरी रोजच्या दृश्यांनी आपल्या मनावर ताण येतो. काही लोक पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर सदृश लक्षणं दर्शवतात. उदाहरणार्थ, वारंवार येणारे वाईट स्वप्न, अस्वस्थता, अचानक रडू येणं किंवा धास्तावलेपण.

मुलं, किशोरवयीन आणि वृद्धांचा विशेष धोका

मूलं आणि किशोरवयीन तरुणांना वास्तव आणि काल्पनिक यातील फरक पूर्णपणे समजत नाही. जेव्हा ते युद्धाची दृश्यं पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात भीती, असुरक्षिततेची भावना आणि गोंधळ निर्माण होतो. अनेकदा त्यांना झोप न लागणे, वाईट स्वप्नं येणे किंवा शाळेपासून दुरावा वाटणे अशी लक्षणं दिसतात. आक्रमक प्रवृत्ती असलेले मूल आणखी आक्रमकपणे वागते. एखादे मूल हिंसाचार पाहून खूप उत्तेजित होते. ही नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया हळूहळू सवयीची होते आणि मूल असंवेदनशील होते. तर वृद्ध व्यक्तींना विशेषतः ज्यांनी आधीचे युद्ध अनुभवलेले असते, अशा दृश्यांनी जुन्या आठवणी सतावतात. त्यांच्यासाठी ही दृश्ये 'स्मरणपत्र रिमाइंडर' ठरू शकतात, आणि पूर्वीच्या भावनिक जखमा पुन्हा उफाळून येतात.

पत्रकारांचं आणि माध्यम कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य

युद्धाची बातमी देणारे पत्रकार, फोटोग्राफर्स आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी हे प्रत्यक्ष रणांगणावर असतात. त्यांना मृत्यू, वेदना आणि भीती याचा थेट सामना करावा लागतो. यामुळे अनेकजण मानसिक थकवा, नैराश्य आणि नैतिक वेदना अनुभवतात. 'आपण हे चित्र कॅमेऱ्यात टिपतोय पण वाचवू शकत नाही,' ही अपराधी भावना त्यांच्या मनात खोल रुजते.

सामाजिक परिणाम : दिशाभूल आणि थकवा

सामाजिकदृष्ट्याही हे युद्ध वार्तांकन परिणामकारक ठरते. काहीवेळा चित्रफीत किंवा छायाचित्र खास निवडून दाखवली जातात. त्यामुळे जनतेच्या भावना दिशा बदलतात, आणि लोक ध्रुवीकरणाच्या वाटेवर जातात. काही वेळा खोट्या माहितीचा प्रसार होतो आणि द्वेष वाढतो. याशिवाय, जेव्हा जनता सतत दुःखद दृश्ये पाहते, तेव्हा एक वेळ अशी येते की त्यांची सहानुभूती संपते. या अवस्थेला 'सहानुभूती थकवा' म्हणतात. त्यामुळे आपण दुसऱ्याच्या वेदना पाहूनही निष्क्रिय राहतो.

माध्यमांची जबाबदारी आणि प्रेक्षकांची सजगता

युद्धाचं वास्तव दाखवणं हे महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर माध्यमांनी एक नैतिक भान ठेवणंही गरजेचं आहे. कोणती दृश्यं दाखवायची, किती वेळ, कोणत्या संदर्भात आणि कोणाला न दुखावता, हे ठरवणं फार नाजूक काम आहे. प्रेक्षकांनीही सजग राहणं गरजेचं आहे. सतत अशा बातम्यांच्या भडिमाराने आपण मानसिकरित्या थकतो, म्हणून माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या माहितीकडे सजग दृष्टीने बघणं, वेळोवेळी ब्रेक घेणं आणि स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

आपण सर्वजण या डिजिटल युगाचे भाग आहोत. माहितीच्या महासागरात वाहून न जाता, प्रत्येक चित्र, व्हिडीओ आणि बातमीमागचं सत्य, हेतू आणि त्याचा मानवी परिणाम समजून घेणं आपली जबाबदारी आहे. युद्धाची दृश्यं केवळ माहितीपुरती नसतात. ती आपल्या अंतर्मनावर खोलवर परिणाम करणारी असतात. काही वेळा ती दृश्यं जनजागृती करतात, समाजमन हलवतात, तर काही वेळा त्या दृश्यांनी लोकांच्या मनात भीती, निराशा आणि सुन्नपणा निर्माण होतो. यासाठी आपल्याला आवश्यक आहे एक मानवी दृष्टिकोनातून विचार करणारी माध्यम संस्कृती. जी सत्यही सांगेल, पण माणुसकीही जपेल. स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि गरज असल्यास थांबा. कारण युद्धाच्या दृश्यांचा भार कधी कधी आपल्या मनावर युद्धच निर्माण करू शकतो.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान