सुखनिद्रा - स्लीप डिव्होर्स : आता हे नवीन काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 08:04 AM2022-12-22T08:04:16+5:302022-12-22T08:04:36+5:30
प्रत्येकासाठी झोप ही अतिशय अत्यावश्यक अशी गोष्ट. आपलं संपूर्ण आरोग्यच झोपेवर अवलंबून असतं.
प्रत्येकासाठी झोप ही अतिशय अत्यावश्यक अशी गोष्ट. आपलं संपूर्ण आरोग्यच झोपेवर अवलंबून असतं. झोप न झाल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण तर मिळतंच; पण झोपेत मध्येच व्यत्यय आल्यामुळे अनेकांचा चिडचिडेपणाही वाढतो. त्यामुळे शांत झोपेला अनेकांची पहिली पसंती असते. त्यासाठी अनेकांची तर आपल्या नात्यावरही पाणी सोडण्याची तयारी असते. अमेरिकेसारख्या देशांमध्ये तर आता त्यामुळेच ‘स्लीप डिव्होर्स’ ही संकल्पना वेगानं प्रचलित होते आहे.
स्लीप डिव्होर्स हा नेमका काय प्रकार आहे?
प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी असते. त्यासंदर्भात त्यांच्या सवयी वेगवेगळ्या असतात. जेव्हा दोन जोडीदारांपैकी एखाद्यालाही झोपण्याच्या संदर्भात वेगळ्या सवयी असतील, झोपण्याचा त्याचा पॅटर्न वेगळा असेल, म्हणजे कोणाला रात्री उशिरा झोपण्याची सवय असते, तर कोणाला लवकर, कोणी रात्रीतून बऱ्याचदा उठतो, तर कोणाला रात्री झोपल्यानंतर कोणताही व्यत्यय नको असतो.. कोणी रात्री झोपल्याबरोबर घोरायला सुरुवात करतो, तर कोणाला बेडमध्ये अस्ताव्यस्त लोळायची सवय असते.. काहीही असलं तरी दुसऱ्या जोडीदाराला त्याचा त्रास होतो. त्याची झोप मोडते. पुढचा अख्खा दिवस खराब जातो. असं जर वारंवार होत गेलं तर त्यांची चिडचिड वाढते आणि त्यांच्या नात्यांमध्येही दुरावा येऊ शकतो. असं होऊ नये यासाठी अमेरिका, इंग्लंडसारख्या पाश्चात्त्य देशांमध्ये ‘स्लीप डिव्होर्स’ ही संकल्पना उदयास आली आहे. याचाच अर्थ दोन्ही जोडीदारांनी वेगवेगळ्या बेडवर किंवा वेगवेगळ्या रूममध्ये किंवा स्वतंत्रपणे झोपणे; ज्यामुळे कोणाच्याच झोपेत व्यत्यय येणार नाही आणि त्यांच्या नात्यावरही त्याचा परिणाम होणार नाही! प्रत्येकाला पुरेशी आणि दर्जेदार झोप मिळेल!
‘स्लीप डिव्होर्स’ हा प्रकार पाश्चात्त्य देशांमध्ये आता रुळला असला आणि त्याचे बरेच फायदेही दिसून येत असले तरीही आपल्या झोपेच्या पद्धती आणि सवयी आयोग्यदायी असाव्यात; ज्यामुळे आपल्या जोडीदाराला त्रास होणार नाही, असंही अनेकांना वाटतं. ‘स्लीप डिव्होर्स’बाबत अमेरिकेतील ४१ टक्के लोक अनुकूल आहेत. २४ टक्के लोकांना वाटतं, याचा फारसा फायदा नाही, तर ३५ टक्के लोकांना याबाबत ठाम मत बनवता आलेलं नाही. तरीही हा प्रकार मात्र तिथे रुजतो आहे. ‘स्लीप डिव्होर्स’चे नेमके फायदे पाहूयात पुढच्या लेखात..