स्वाईन फ्लूमुळे गर्भवतीचा मृत्यू
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:37+5:302015-01-23T01:05:37+5:30

स्वाईन फ्लूमुळे गर्भवतीचा मृत्यू
>-महिन्याभरात सहा जणांचा मृत्यू : मेडिकलमध्ये आठवड्याभरात चार जणांचा मृत्यू (स्वाईन फ्लूचा फोटो वापरावा)नागपूर : पाच वर्षांपूर्वी दहशत माजवणाऱ्या स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा धूडगूस घातला आहे. या महिन्यात आतापर्यंत १२ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पुन्हा एका स्वाईन फ्लू रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे या रोगाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे स्वाईन फ्लू वॉर्ड स्वतंत्र असतानाही येथे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे (मेडिसीन) रुग्ण ठेवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाडी येथील प्रिया पंकज हुमने (२२) असे मृताचे नाव आहे. प्रिया ही नऊ महिन्याची गर्भवती होती. मिळालेल्या माहितीनुसार प्रिया हुमने हिच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी तिच्या घशाचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तिला स्वाईन फ्लू असल्याचा अहवाल मिळताच प्रियाला वॉर्ड क्र. २५ मध्ये स्थानांतरीत करण्यात आले. बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गर्भातील नऊ महिन्याच्या शिशूलाही डॉक्टरांना वाचविता आले नाही. मेडिकलमध्ये आतापर्यंत आठ जण पॉझिटीव्ह आले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. इतर दोन रुग्णांचा मृत्यू खासगी इस्पितळात झाला.-स्वाईन फ्लूच्या वॉर्डात मेडिसीनचे रुग्ण२००९ मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ झाल्याने वॉर्ड क्र. २५ला स्वाईन फ्लू वॉर्ड करण्यात आले. २०१२ नंतर या रोगाच्या रुग्ण संख्या घटली. यामुळे मेडिसीन विभागाच्या महिला रुग्णांना या वॉर्डात ठेवण्यात येऊ लागले. परंतु आता पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढल्याने मेडिसीनचे रुग्ण अडचणीत आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिसीन विभागाला हा वॉर्ड रिकामा करण्याचे आदेश दिले. परंतु रुग्णांना ठेवावे कुठे हा प्रश्न विभागासमोर ठाकला आहे. दुसरीकडे मेडिसीनच्या रुग्णांसोबत स्वाईन फ्लूचे रुग्ण ठेवण्यात येत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.-व्हेंटिलेटरही अपुरेरुग्ण अत्यवस्थ झाला की श्वासोच्छवास घेण्यात अडचण होते. अशावेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येतो व हे काम व्हेंटिलेटर हे अत्याधुनिक यंत्र करते. परंतु मेडिकलमध्ये केवळ १७ व्हेंटिलेटर सुरू असल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ३१ व्हेंटिलेटर मधून तीन व्हेंटिलेटर पूर्णत: निकामी आहेत. उर्वरित २८ मधून तब्बल ११ बंद आहेत.