कोरोनाकाळात केवळ ८२ हजार लहान-मोठ्या शस्त्रक्रिया; राज्यातील मागील तीन महिन्यांची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:16 AM2020-08-26T02:16:12+5:302020-08-26T06:46:16+5:30

पुण्यात एप्रिल ते जून या काळात ३,२६५ मोठ्या, तर ५,६१० लहान अशा एकूण ८,८७५ शस्त्रक्रिया झाल्या. २०१९-२० साली याच काळात पुण्यात १५,३७७ शस्त्रक्रिया झाल्या होत्या,

Only 82,000 major and minor surgeries; Statistics for the last three months in the state | कोरोनाकाळात केवळ ८२ हजार लहान-मोठ्या शस्त्रक्रिया; राज्यातील मागील तीन महिन्यांची आकडेवारी

कोरोनाकाळात केवळ ८२ हजार लहान-मोठ्या शस्त्रक्रिया; राज्यातील मागील तीन महिन्यांची आकडेवारी

Next

स्नेहा मोरे 

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या संसर्गाचा असलेला धोका ओळखून सरकारी, पालिका व खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. तरीही कोरोनाकाळात म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत लहान-मोठ्या मिळून ८२ हजार ८६० शस्त्रक्रिया पार पडल्या. कोरोनापूर्वीच्या तुलनेत या शस्त्रक्रियांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात २०१९-२० या वर्षात एप्रिल ते जूनदरम्यान लहान-मोठ्या १ लाख ७५ हजार १५८ शस्त्रक्रिया झाल्या. शस्त्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा धोका अधिक होता, शिवाय रुग्णांमध्येही कोरोनाची मानसिक भीती असल्याने मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये खंड पडला.

पुण्यात एप्रिल ते जून या काळात ३,२६५ मोठ्या, तर ५,६१० लहान अशा एकूण ८,८७५ शस्त्रक्रिया झाल्या. २०१९-२० साली याच काळात पुण्यात १५,३७७ शस्त्रक्रिया झाल्या होत्या, त्यात मोठ्या ८,१०८ तर लहान ७ हजार २६९ शस्त्रक्रियांचा समावेश होता. मुंबईत कोरोनाकाळात तीन महिन्यांमध्ये १,६१६ मोठ्या, तर १,९९९ लहान अशा एकूण अवघ्या ३,६१५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मागील वर्षी एप्रिल ते जून या काळात शहर-उपनगरात १६,३७८ मोठ्या, तर १५,९६३ लहान शस्त्रक्रिया मिळून एकूण ३२,३४१ शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या.

आता हळूहळू मुंबईसह राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, कोरोनाच्या काळात अन्य आजारांच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. आता अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यातही हृदयविकाराशी निगडित आजार असणाऱ्यांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अधिक आहे. नुकतीच राज्य सरकारने शस्त्रक्रियांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

अशी आहेत मार्गदर्शक तत्त्वे
प्रकृती गंभीर असलेले रुग्ण, गर्भवती, तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या व्यक्तींची नॅट चाचणी करावी लागते. मात्र नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या रुग्णालयांत नॅट चाचणीची सुविधा नसेल अशा ठिकाणी अँटिजन चाचणी करून उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी, बायपास, गर्भवती, ब्रेनडेड यासारख्या तातडीने आवश्यकता असलेल्या शस्त्रक्रियांचा मार्ग मोकळा झाला आहे. अँटिजन चाचणीमुळे या रुग्णांच्या शस्त्रक्रिया अवघ्या अर्ध्या तासात करणे शक्य होईल.
मनोरुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांना तसेच तुरुंगामध्ये दाखल होणाºया कैद्यांना एक आठवडाच क्वारंटाइन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अँटिजन चाचणी करून त्यानुसार त्यांना आयसोलेशन वॉर्ड किंवा रुग्णालयामधील संबंधित वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घ्यावा, अशा राज्य सरकारच्या सूचना आहेत.

Web Title: Only 82,000 major and minor surgeries; Statistics for the last three months in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.