डॉ. नंदू मुलमुले मनोविकार तज्ज्ञ
नुकत्याच घडून गेलेल्या एका सुशिक्षित तरुणाच्या 'प्रकट' आत्महत्येच्या घटनेनंतरची गोष्ट. एका महिला प्राचार्यांकडे बसलो होतो. 'एका पुरुषाने पत्नीच्या छळामुळे आत्महत्या केली तर लोकांना इतका धक्का बसला, अशा कितीतरी महिलांना शतकानुशतके या पुरुषप्रधान समाजात आत्महत्या कराव्या लागल्या,' हे त्यांचे मत. आत्महत्या, मग कुणाला का करावी लागेना वाईटच, मात्र त्याला असाही सामाजिक आयाम असू शकतो हे त्यांचे बरोबरच. आज समाजमाध्यमांचे युग अवतरले आहे.
या युगात एखाद्या घटनेचा अतिरेकी गवगवा होतो. समाजमाध्यमे म्हणजे आधुनिक चव्हाटा ! तेथे उथळ मत-मतांतरांचा महापूर येतो. मात्र क्रिया-प्रतिक्रियांच्या महापुरात स्त्री- पुरुष भेदभावापलीकडे पीडित व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार व्हायला हवा हेही महत्त्वाचे.
आता आत्महत्या ही घटना एकच असली तरी पुरुषांचे म्हणून काही वेगळे ताणतणाव असतात का? पुरुष कुटुंबाचा कर्ता, समाजात हवे तसे वावरण्याची त्याला मुभा, आपले ताण व्यक्त करण्याचे त्याला बळ प्राप्त, अशा व्यवस्थेत त्याला आत्महत्येचे टोक गाठण्याइतका ताण का यावा?
माणसाच्या मनाचा विचार जैविक आणि सामाजिक असा करता येतो. मुळात मन ही एक जैव-सामाजिक घटना आहे. मनाचे स्थान मेंदूत असले तरी त्यावर भोवतालच्या परिस्थितीचा परिणाम होत असतो. परिस्थिती पुरुषांना अनुकूल, मग ताण कशाचा? हा प्रश्न सकृतदर्शनी साहाजिक वाटला तरी तो वास्तवाचे सुलभीकरण करणारा आहे. मुळात पुरुषांकडून अवास्तव पौरुषाची अपेक्षा करणारा आहे. 'मर्द को दर्द नही होता' अशा भाकड फिल्मी संवादांना तो शोभेल, मात्र वैज्ञानिक सत्य काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
मेंदूच्या पातळीवर स्त्री-पुरुषांत फार थोडा भेदभाव आहे. फरक आहे तो दोन वेगळ्या संप्रेरकांचा. प्रत्येकजण एक कोरा मेंदू घेऊन जन्माला येतो. पुरुष-मेंदू हा हा काही व संप्रेरकांच्या अधिक मात्रेमुळे 'पुरुष' होतो. पुरुषांमध्ये स्त्रीत्व प्रदान करणारी संप्रेरके कमी आणि पुरुष- संप्रेरके ठळक. निसर्गाचे हेच तत्त्व स्त्रियांच्या बाबतीतही खरे.
मनाच्या बाबतीत काय?
त्याचा शोध घेतला कार्ल युंग या स्विडिश मनोविकारतज्ज्ञाने. त्याच्या मते आपल्या मनाची दोन तत्त्वे आहेत, अनिमा आणि अनिमस. अनिमा हे स्त्रीतत्त्व, अनिमस हे पुरुषतत्त्व. प्रत्येक पुरुषाच्या मनात काहीअंश स्त्रीतत्त्वाचा असतो, तर प्रत्येक स्त्रीत पुरुषतत्त्वाचा. एखाद्या स्त्रीत अनिंमसचे प्रमाण अधिक असेल तर ती मनाने पुरुषी वाटू शकते. ती कणखर, धीट, धाडसी गणल्या जाते. एखाद्या पुरुषात स्त्रीत्तत्त्व अधिक प्रमाणात असेल तर तो संवेदनशील, अधिक हळव्या, नाजूक मनाचा होतो. मेंदूतील स्त्री-पुरुष तत्त्वाचा हा असा दोलायमान होणारा तराजू, हे वैज्ञानिक सत्य, मात्र ते समजून न घेतल्याने अशा पुरुषाची समाजात 'स्त्रैण' अशी संभावना होऊ शकते. पुरुषसत्ताक समाजाचा जाच जितका स्त्रियांना होतो तितकाच अशा पुरुषांनाही होतो. एकतर कर्तेपणाची भूमिका पार पडण्याची जबाबदारी. त्या जबाबदारीपायी असे पुरुष लवकर दबून जातात. जीवनातल्या संघर्षापुढे कमी पडतात. त्यात त्यांचा सामना 'बाईमाणूस' असलेल्या स्त्रीशी पडला तर मग विचारायलाच नको.
मदतीची हाक द्या
आत्महत्या ही एका अर्थाने तथाकथित संस्कृती आणि प्रगतीच्या स्पर्धेची जीवघेणी देणगी. प्राणी आत्महत्या करीत नाहीत. संस्कृतीने समाज जन्माला घातला आणि समाजाने असमानता आणि मनोविकार ! तुम्हाला जर काही दुःख असेल तर लक्षात ठेवा, आत्महत्येनं ते संपत नाही, तुम्ही ते जन्मभरासाठी आपल्यावर प्रेम करणाऱ्यांच्या ओटीत टाकून जाता. आत्महत्या हे कुठल्याच समस्येचं उत्तर नाही, कुठल्याच आजाराचा उपचार नाही. ते करण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून मदतीची हाक द्या.
ताणाची कारणे
आता आत्महत्या ही घटना एकच असली तरी पुरुषांचे म्हणून काही वेगळे ताणतणाव असतात का, असे प्रश्न उपस्थित केले जातात. ते साहजिक आहे. पुरुषांना कामाचा, वैयक्तिक, सामाजिक, स्पर्धेचा, आरोग्यातील बदलांचा, जीवनात सातत्याने होणाऱ्या बदलांचा, आर्थिक, नातेसंबंधांचा, दुःखद घटनांचा किंवा जुन्या-वाईट घटनांच्या आठवणींचा ताण येऊ शकतो.