स्वाईनची लक्षणे आढळल्यास औषधे सुरु करा! तपासणीसाठी वेळ घालवू नका, औषधे घ्या गरज असल्यासच करा तपासणी
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30

स्वाईनची लक्षणे आढळल्यास औषधे सुरु करा! तपासणीसाठी वेळ घालवू नका, औषधे घ्या गरज असल्यासच करा तपासणी
>मुंबई: स्वाईन फ्लूचा संसर्ग प्राथमिक पातळीवर असल्यास तपासणीशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. एक- दोन दिवस लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी करण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा औषधोपचार वेळीच सुरु करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वाईनचा संसर्ग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टरांनी सरसकट सर्वांच्या तपासण्या करु नयेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. मुंबईसह राज्यात फैलावत असलेल्या स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी पुण्यातील आरोग्य अधिकार्यांशी संवाद साधला. यावेळी स्वाईन फ्लू संदर्भात काही विषयांवर चर्चा करण्यात आली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार ही बैठक झाली. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची ए, बी आणि सी अशी विभागणी करण्यात आली आहे. मुंबईतील खासगी लॅबमध्ये अनेकजण स्वाईन फ्लूची तपासणी करुन घेत आहेत. पण, ज्या व्यक्तींना एकच दिवस ताप, सर्दी, खोकला आहे. अथवा दोन-तीन दिवस कमी ताप, सर्दी खोकला असलेले रुग्ण ए आणि बी कॅटेगरीमध्ये मोडतात. या रुग्णांना तपासणीची आवश्यकता नाही. या रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन औषधे सुरु केल्यास त्यांचा संसर्ग वाढत नाही. उलट त्यांचा आजार बरा होण्यास मदत होते. यामुळे पुढच्या काही दिवसांतच स्वाईनच्या तपासणीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात येणार आहेत, असे या बैठकीत ठरवण्यात आले.एखाद्या व्यक्तीला स्वाईनची लक्षणे असल्यास त्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लक्षणे आढळल्यास त्यावर त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरु करावेत, या प्रकारची जनजागृती राज्यात गणेशोत्सवादरम्यान करण्यात यावी याविषयी पुण्याच्या अधिकार्यांना माहिती देण्यात आली. याचबरोबर स्वाईनची तपासणी कशी करावी, कोणत्या पद्धतीने उपचार करावेत, रुग्णांची काळजी कशी घ्यावी, याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)............................(चौकट)३७५ गर्भवती महिलांना दिली लस स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. हे लक्षात घेऊन गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूची लस दिली जात आहे. आत्तापर्यंत ३७५ गर्भवती महिलांना स्वाईनची लस देण्यात आली आहे. ............................