HEALTH : चालण्यामुळे कर्करोग्यांच्या आयुष्यामानात सकारात्मक बदल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 18:33 IST
संशोधनानुसार नियमित चालण्यामुळे कर्करोगग्रस्तांच्या आयुष्यमानावर सकारात्मक बदल होत असल्याचे जाहीर केले आहे.
HEALTH : चालण्यामुळे कर्करोग्यांच्या आयुष्यामानात सकारात्मक बदल !
-Ravindra Moreसरे विद्यापीठ आणि किंग्ज महाविद्यालय लंडन येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार नियमित चालण्यामुळे कर्करोगग्रस्तांच्या आयुष्यमानावर सकारात्मक बदल होत असल्याचे जाहीर केले आहे. आठवड्यातील तीन दिवस फक्त ३० मिनिटे चालण्यामुळे कर्करोग्यांच्या आयुष्यमान दर्जात सुधारणा होत असल्याचीही माहिती नव्या शास्त्रीय अभ्यासादरम्यान समोर आली आहे. या अभ्यासादरम्यान ४२ कर्करोगी रुग्णांना दोन गटांत विभागण्यात आले होते. पहिल्या गटातील रुग्णांना दिलेल्या प्रशिक्षणात त्यांना एक दिवसाआड तीस मिनिटांसाठी चालण्यास प्रवृत्त करण्यात आले. तर दुसऱ्या गटातील लोकांना दैनंदिन जीवनात कोणताही बदल न करण्यास सांगितले. संशोधनाअंती पहिल्या गटातील लोकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यात सुधारणा दिसून आली. सहभागी झालेल्या रुग्णांनी नियमित चालल्यामुळे या आजाराविरुद्ध लढा देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र कर्करोग जास्त बळावला असलेल्या रुग्णांमध्ये शारीरिक हालचालींचे प्रमाण अत्यंत कमी होते.नियमित व्यायामामुळे कर्करोग पुन्हा बळावण्यापासूनही थांबविले जाऊ शकते, त्याचप्रमाणे इतर गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवता येते. असे सरे विद्यापीठाच्या एमा रिअम यांनी सांगितले.तीव्र आजारांनी ग्रासलेले लोक व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात अशा वेळेस त्यांना प्रवृत्त करत, त्याच्या दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करणे फायद्याचे असल्याचे रिअम यांनी सांगितले.या अभ्यासाचे अधिक खात्रीलायक पुरावे मिळविण्यासाठी जास्त रुग्णांवर नियमित चालण्यामुळे होणाऱ्या शारीरिक, सामाजिक व भावनिक आरोग्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. असे किंग्ज विद्यालयाच्या जो अर्म्स यांनी सांगितले. हा शास्त्रीय अभ्यास बीएमजे ओपन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. Also Read : हृदयरोग टाळायचा? मग चला ‘वॉक’ला