विनापरवाना सॉस तयार करणार्या कंपनीवर एफडीएचा छापा ७११२ किलोचे सॉस केले जप्त
By Admin | Updated: February 17, 2016 00:24 IST2016-02-17T00:24:55+5:302016-02-17T00:24:55+5:30

विनापरवाना सॉस तयार करणार्या कंपनीवर एफडीएचा छापा ७११२ किलोचे सॉस केले जप्त
>मुंबई: घाटकोपर येथे विना परवाना सॉस तयार करणार्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकली. येथे अस्वच्छ जागेत आणि फळे, भाज्या व्यतिरिक्त अन्य पदार्थ वापरुन सॉस तयार केले जात होते. या कारखान्यातून ७ हजार ११२ किलोच्या सॉससह १ लाख ८८ हजार ९१६ रुपये किंमतीचा अन्य अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. विक्रीसाठी कोणताही अन्नपदार्थ तयार करताना एफडीएचा परवाना असणे आवश्यक आहे. मात्र, घाटकोपर, असल्फा येथील आझाद मार्केटमध्ये मे. कुमार फूड प्रॉडक्टसचा कारखान्यात विनापरवाना सॉस तयार केले जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. या माहिती आधारे एफडीएच्या दक्षता विभागाने १२ फेब्रुवारी रोजी या कारखान्यावर धाड टाकली. यावेळी कारखान्यात व्हेजिटेबल सॉस, सोयाबीन सॉस, टोमॅटो सॉस इत्यादींची निर्मिती केली जात होती. अस्वच्छ जागेतही सॉस तयार करत होते, अशी माहिती एफडीएचे सह आयुक्त दक्षता हरीश बैजल यांनी दिली. नियमानुसार, सॉस बनविताना आवश्यक असणार्या फळे, भाज्या अथवा व्हेजिटेबल पल्पचाच फक्त वापर केला पाहिजे. या कारखान्यात सॉस बनवताना राईस आटा, चिली पावडर आणि कृत्रिम रंगाचा वापर केला जात होता. तर, टोमॅटो सॉस बनवण्यासाठी गाजर आणि बीटचा वापर केला जात होता. या प्रकरणात व्हेजिटेबल सॉस, सोयाबीन सॉस, टोमॅटो सॉस आणि अन्य घटक अन्नपदार्थांबरोबर ९ अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे बैजल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)