डोळ्यांचे आरोग्यही महत्त्वाचे - पद्मश्री डॉ. एस. नटराजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 12:54 AM2021-01-01T00:54:01+5:302021-01-01T00:54:19+5:30

आपल्या हृदयाप्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्यविषयक समस्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मात्र, या समस्यांकडे आपण कायमच दुर्लक्ष करतो. त्यामुळे उशिरा निदान झाल्यामुळे ...

Eye health is also important - Padma Shri Dr. S. Natarajan | डोळ्यांचे आरोग्यही महत्त्वाचे - पद्मश्री डॉ. एस. नटराजन

डोळ्यांचे आरोग्यही महत्त्वाचे - पद्मश्री डॉ. एस. नटराजन

googlenewsNext

आपल्या हृदयाप्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्यविषयक समस्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मात्र, या समस्यांकडे आपण कायमच दुर्लक्ष करतो. त्यामुळे उशिरा निदान झाल्यामुळे त्यावर उपचार करणे कठीण होते. बरेचदा नेत्रतज्ज्ञांकडे येणाऱ्या ८५ टक्के रुग्णांमध्ये डोळ्यांच्या समस्यांचे उशिराने निदान होते. हे चुकीचे असून, रुग्णांनी कोरोनाच्या काळातही योग्य ती खबरदारी घेऊन उपचार घेतले पाहिजेत, असा महत्त्वाचा सल्ला ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे सीएमडी पद्मश्री डॉ. एस. नटराजन यांनी दिला आहे.

हल्ली वेळेच्या आत जन्माला येणारी बालके, जन्माच्या वेळी जेमतेम १,००० ग्रामपेक्षा कमी वजन असलेली बालके प्रगत वैद्यकीय तंत्राचा आधार घेऊन वाचविता येऊ शकतात, असे नमूद करीत डॉ.नटराजन म्हणाले, मुळात गर्भातल्या बाळाची वाढ ही तिसऱ्या महिन्यापासूनच सुरू होते. गर्भात गरोदरपणातल्या टप्प्यावर एकेक अवयवही विकसित होत असतात. वेळेच्या आत जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये रेटिना विकसित होण्यात अडसर येतो. शिवाय अतिप्रकाशामुळे अशा बालकांच्या डोळ्यातील आतल्या पडद्यावरही परिणाम होण्याची जोखीम असते. रेटिनाला वाहिन्यांद्वारे योग्य प्राणवायू पोहोचत नाही. त्यामुळे शरीर पर्यायी रक्तवाहिन्या विकसित करते. हे दृष्टीसाठी धोक्याचे ठरते. हे टाळण्यासाठी लेझर ट्रिटमेंट उपलब्ध आहे. प्रदीर्घ काळातल्या मधुमेहातही रेटिना खराब होण्याची जोखीम असते.

अनेकदा डोळ्यांना जखमा झाल्याने रुग्ण उपचाराला येतात. विशेषत: अपघाती रुग्ण आणि खेळाडूंमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जराशी काळजी घेतली, तर शरीराचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि दृष्टी देणारा हा अवयव वाचविला जाऊ शकतो, याकडे डॉ.नटराजन यांनी लक्ष वेधले.
प्रगत झालेल्या वैद्यकशास्त्रामुळे सरासरी आयुष्यमानात वाढ झाली आहे. दुर्धर व्याधीही आटोक्यात येऊ शकतात. गरोदरपणातल्या जोखिमा ओळखताही येतात. मात्र, अनेक जोखिमा टाळता येत नाहीत. गर्भातल्या बाळाची शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे वाढ होण्यासाठी किमान ३६ आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र, अनेकदा ही नैसर्गिक साखळी खंडित होते. त्यामुळे मुदतपूर्व बाळंतपणे होतात. अशा वेळी रेटिना विकसित न झाल्याने या बालकांना अंधत्वाचे धोके असतात, असे डॉ. नटराजन म्हणाले.

देशात नेत्रविकार असलेले असंख्य रुग्ण आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सर्वच लोकांना परवडत नाही. त्यामुळे भारतीय नेत्रतज्ज्ञांनी संशोधन, नवीनता, तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी कामगिरी करावी व आपल्या संशोधनाचा लाभ सर्वसामान्य गरजूंना करून द्यायला हवा. आपल्या देशात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली होती. अलीकडच्या काळात नेत्रविकार चिकित्सेवर देशात चांगले संशोधन झाले आहे. नेत्रदान चळवळ, नेत्रविकार, तसेच मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार यांबद्दल समाजात अधिक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भावी पिढीला नेत्रविकारांबाबत जागरूक करण्यासाठी नेत्रविकार तज्ज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेऊन, या क्षेत्रात अधिक परिणामकारक संशोधनाचे कार्य हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.     (शब्दांकन : स्नेहा मोरे)

 

Web Title: Eye health is also important - Padma Shri Dr. S. Natarajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य