अंडी आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे वेळोवेळी सांगितलं जातं. नियमित अंडी खाणाऱ्यांना याचे फायदेही चांगले माहीत आहेत. तुम्हीही नियमित अंडी खात असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की, दररोज २ अंड्यांपेक्षा अधिक अंडी खाणे जीवघेणं ठरू शकतं.
अंड्यांबाबत करण्यात आलेल्या या नव्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर एखादी व्यक्ती दररोज २ पेक्षा अधिक अंडी खात असेल तर त्या व्यक्तीला कार्डिओवस्क्युलर डिजीज म्हणजेच हृदयरोगाशी संबंधित आजार होण्याचा आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
३० हजार लोकांच्या आहारावर ३१ वर्ष ठेवली गेली नजर
अमेरिकन मेडिकल असोसिएशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये अमेरिकेतील साधारण ३० हजार लोकांच्या डाएट, त्यांचं आरोग्य आणि लाइफस्टाइलशी निगडीत सवयींवर ३१ वर्षांपर्यंत लक्ष ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्सचे प्राध्यापक कॅथरीन टकर सांगतात की, 'आमच्या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, अंड्यांमध्ये जे कलेस्ट्रॉल आढळतं, त्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात'.
एका अंड्यात किती असतं कलेस्ट्रॉल
अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरनुसार, एका मोठ्या अंड्यात साधारण २०० मिलिग्रॅमपर्यंत कलेस्ट्रॉल आढळतं. अशात दररोज ३०० मिलिग्रॅमपेक्षा अधिक कलेस्ट्रॉलचं सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका १७ टक्क्यांनी आणि अकाली निधनाचा धोका १८ टक्क्यांनी वाढतो. कॅथरीन सांगतात की, 'माझा हाच सल्ला असेल की, दररोज २ अंडी किंवा दोन ऑम्लेटपेक्षा जास्त सेवन करू नये. कारण न्यूट्रिशनचा अर्थ आहे संयम आणि योग्य बॅलन्स'.