(Image Credit : freedesignfile.com)
दुधाचे आरोग्याला होणारे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. त्यामुळे अनेकजण फिट राहण्यासाठी आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व पुरवण्यासाठी नियमितपणे दुधाचं सेवन करतात. मात्र, अनेकजण नुसतं दूध पिण्याचा कंटाळा येतो म्हणून दुधासोबत काही इतर पदार्थही खातात. पण असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
आयुर्वेदानुसार, काही पदार्थ एकत्र सेवन केल्याने पचनक्रियासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. उडीद डाळ आणि दूध दोन्ही गोष्टी पचनास वेळ घेतात. त्यामुळे या दोन्ही एकत्र सेवन केल्याने गॅसची समस्या होऊ शकते. त्यासोबतच असे अनेक पदार्थ आहेत, जे दुधासोबत सेवन करणे महागात पडू शकतं.
चटपटीत किंवा चिप्स
दुधासोबत चिप्स आणि चटपटीत पदार्थ खाणे टाळा. मिठामुळे दुधात असलेल्या प्रोटीनचा पूर्ण फायदा मिळू शकत नाही. तसेच असे केल्याने त्वचेशी संबंधित समस्याही होऊ शकतात.
कांदा
तुम्ही जे खाताय त्यात कांदा असेल तर त्यासोबत किंवा ते खाऊन झाल्यावर दुधाचं सेवन करू नका. या कॉम्बिनेशनने खाज, एग्जिमा, शरीरावर लाल चट्टे अशा त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
तिखट
तिखट-मसालेदार पदार्थ खात असाल तर त्यासोबत दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी, गॅस आणि उलटीची समस्या होऊ शकते.
मासे
मासे गरम असतात. तर दूध थंड असतं. या दोन्ही गोष्टी एकत्र सेवन केल्यास गॅस, अॅलर्जीची समस्या होऊ शकते.
दही
दूध आणि दह्यापासून तयार पदार्थ एकाच वेळी खाऊ नये. हे पदार्थ एकाचवेळी खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस, उलटी आणि अपचन यांसारख्या समस्या होतात.
लिंबू
लिंबू किंवा इतर दुसरे आंबट पदार्थ खाणार असाल तर पुढील एक तास दुधाचं सेवन करू नका. हे एकत्र खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते.