(Image Credit : Sharecare)
अनेकदा शरीरामध्ये वेगवेगळे बदल दिसून येतात. कधी त्वचेवर इन्फेक्शन होतं, तर कधी शरीराच्या काही भागांमध्ये वेदनांचा सामना करावा लागतो. अचानक केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो, तर कधी हिरड्यांवर सूज येते. पण आपण अनेकदा या समस्या साधारण समजून त्यांच्याकडे दुर्लक्षं करतो. पण या समस्या अनेकदा गंभीर रूप धारण करू शकतात. तुम्हालाही शरीरामध्ये काही असे बदल किंवा समस्या दिसून आल्या तर दुर्लक्षं करू नका आणि तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शरीरामध्ये घडून येणाऱ्या बदलांबाबत सांगणार आहोत, ज्यांना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या समस्यांकडे दुर्लक्षं केलं तर कालांतराने या लहान समस्या मोठं रूप धारण करू शकतात.
जिभेवर पांढरा थर येणं
काहि दिवसांपासून तुमच्या जिभेवर पांढरा थर येत असेल तर याकडे साधारण समस्या समजून दुर्लक्ष करू नका. हे एक प्रकारचं तोंडामध्ये होणारं यीस्ट इन्फेक्शन असू शकतं. तोंडातील यीस्ट-बॅक्टेरिया संतुलन राखण्यासाठी मदत करतो. पण यामध्ये जेव्हा बाहेरील तत्व प्रहार करतात, त्यावेळी यीस्टचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते. अशावेळी ते जिभेवर पांढऱ्या थराच्या रूपामध्ये पसरतात. अशावेळी अॅन्टीफंगल माऊथ सोल्यूशनचा वापर करून जीभ स्वच्छ करा. जर समस्या आणखी वाढली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ओठांच्या किनाऱ्यावरील भेगा
अनेकदा ओठांच्या किनाऱ्यांवरील त्वचेवर भेगा येतात. अनेकदा खाताना किंवा बोलताना त्या भागात जळजळ होते. असं शरीरामधील व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होत असते. विटामिन-बी, बी-2, बी-6 आणि फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे तोंडाच्या बाहेरील किनाऱ्यावरील संवेदनशील त्वचा शुष्क होते. ज्यामुळे त्वचेवर भेगा पडतात. अशावेळी हिरव्या पालेभाज्या आणि कलिंगडाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचा मुलायम राहते आणि डाग दूर होतात.
भुवया बारिक होणं
भुवया पातळ होणं याचा अर्थ आहे की, तुमच्या थायरॉइड ग्रंथी योग्य प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती करू शकत नाहीत. असावेळी डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य सल्ला घ्या.
अनेक महिला डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांच्या समस्येचा सामना करत असतात. हे एखाद्या अॅलर्जीमुळेही होत असून अनेकदा अॅलर्जीमुळे नाक बंद राहतं. डोळे आणि नाकाच्या आजूबाजूच्या नसांवर ताण येतो. ज्यामुळे या भागांतील त्वचा काळी पडते.
केस गळण्याचं प्रमाण वाढणं
अचानक केस गळण्याचं प्रमाण वाढतं. अनेकदा हे लक्षणं थायरॉइडची समस्या दर्शवतं. ठराविक प्रमाणात केस गळणं साधारण असतं. पण केस गळण्याचं प्रमाण वाढलं तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. अशावेळी डॉक्टर्स थायरॉइडसोबतच इतरही अनेक तपासण्या करण्याचा सल्ला देतात. थॉयरॉइज व्यतिरिक्त शरीरामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि विटामिन-ए च्या कमतरेतमुळेही केस गळण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
छोट्या पिवळ्या रंगाच्या गाठी
शरीरामध्ये छोट्या पिवळ्या रंगाच्या गाठी येतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे या गाठी तयार होतात. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये या गाठी होत असतात. परंतु, जर गुडघे, भुवया, हात किंवा पायांमध्ये जर अशा कोलेस्ट्रॉलच्या गाठी दिसून आल्या तर डॉक्टरांकडे जाऊन त्वरित तपासण्या करून घ्या.
नखं कमकुवत होणं
अनेकदा नखं छोट्या छोट्या कारणांमुळे तुटतात. शरीरामधील पोषण जसं कॅल्शिअम, व्हिटॅमिन-डी किंवा झिंक यांसारख्या शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांच्या कमतरतेमुळे नखांवर परिणाम होतो. योग्य आणि संतुलित आहाराच्या सेवनाने या समस्येपासून सुटका करून घेणं फायदेशीर ठरतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.