विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर कारवाईची मागणी
By admin | Updated: February 22, 2016 19:28 IST
जळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीदरम्यान प्रचंड रक्तस्त्राव होऊन विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी मोर्चा काढून पोलीस अधीक्षकांकडे केली. जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मृतदेह रुग्णालयातच होता. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने तो धुळे येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. दरम्यान, विवाहितेच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर १५० ते २०० जणांची गर्दी होऊन त्यांनी प्रचंड आक्रोश केला.
विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर कारवाईची मागणी
जळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीदरम्यान प्रचंड रक्तस्त्राव होऊन विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी मोर्चा काढून पोलीस अधीक्षकांकडे केली. जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मृतदेह रुग्णालयातच होता. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने तो धुळे येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. दरम्यान, विवाहितेच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर १५० ते २०० जणांची गर्दी होऊन त्यांनी प्रचंड आक्रोश केला.तांबापुर्यातील कंझरवाडा भागातील रहिवासी निलिमा लखन घुमाने (२१) या विवाहितेला प्रसुतीसाठी शहरातील डॉ. नंदा जैन यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सोमवारी सकाळी प्रसुतीसाठी तिचे सिझर करण्यात आले. त्यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने विवाहितेची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे डॉक्टरांनी तिला गणपती हॉस्पिटलमध्ये नेेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईकांनी विवाहितेला गणपती हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे उपचाराचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही व विवाहितेचा मृत्यू झाला. नातेवाईकांची प्रचंड गर्दी...विवाहितेच्या मृत्यूची वार्ता समजताच तिच्या नातेवाईकांनी गणपती हॉस्पिटलकडे धाव घेतली. तेथे १५० ते २०० नातेवाईक जमा झाले. प्रचंड आक्रोश....विवाहितेच्या मृत्यूमुळे नातेवाईकांना शोक अनावर होऊन त्यांनी प्रचंड आक्रोश केला. विवाहितेची आई, पती व इतर नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप....डॉ. नंदा जैन यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. विवाहितेचा रक्तदाब कमी असताना व रक्ताचे प्रमाणही कमी असताना डॉक्टरांनी तिचे सिझर केले असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रविवारी रात्री रक्तदाब तपासला असता तो कमी होता व रक्तही कमी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त आरक्षित करुन ठेवले होते. मात्र सोमवारी सकाळी डॉक्टरांनी अशा अवस्थेतच विवाहितेचे सिझर केले, असे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली व तिचा मृत्यू झाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार....जो पर्यंत संबंधित डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे विवाहितेचा मृतदेह संध्याकाळ पर्यंत गणपती हॉस्पिटलमध्येच होता.