सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे बाजारात काही प्रमाणात कैरी यायला सुरूवात झाली आहे. अनेक घरांमध्ये उन्हाळ्यात जेवताना तोंडी लावण्यासाठी तिखट मीठ लावलेली कैरी खातात. घरच्या जेवणासोबत कैरी खाण्याची मजा काही वेगळी असते. फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रिटींना सुद्धा तिखट मीठ लावलेली कैरी खायला खूप आवडतं.
नुकताच अभिनेत्री दीपिका पदुकोननं ही आपल्या सोशल मीडियावर अशाच तिखट-मीठ लावलेल्या कैरीचा फोटा शेअर केला आहे आणि तिला कैरी किती आवडते हे तिनं सांगितलं आहे. याआधीसुद्धा करीनाने तिखट मीठ लावलेल्या कैरीचा फोटो आपल्या सोशल मीडियावर टाकला होता. आज आम्ही तुम्हाला कैरीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत.
तोंडाच्या समस्या कमी होतात
तोंडाला दुर्गंधी येत असेल तर कैरी खावी. याशिवाय हिरड्यांमधून रक्त येणं, दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. मजबूत आणि स्वच्छ दात हवेत तर मग कैरीचं सेवन करावं. तोंडाच्या समस्या दूर करण्यासाठी कैरीचं सेवन फायदेशीर ठरतं.
डिहाड्रेशनची समस्या दूर होते
उन्हाळ्यात शरीरातून घामावाटे अनेक मिनरल्स बाहेर पडतात. अशावेळी कैरी तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करते. कैरीचा ज्युस प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. शरीरात सोडियम आणि इतर मिनरल्सची पातळी नियंत्रणात राहते. ( हे पण वाचा-घामामुळे अनेक गंभीर आजारांपासून राहता येईल दूर, वाचा घाम येण्याचे फायदे)
पोटाच्या समस्या दूर होतात
उन्हाळ्यात पचनसंबंधी समस्या होतात आणि त्यावर कैरी फायदेशीर आहे. कैरीमुळे पाचकरसाची निर्मिती नीट होते आणि पचनप्रक्रिया सुरळीत पार पडते. मलावरोध, अपचन, एसिडीटी, हार्टबर्न, मळमळ अशा समस्या दूर होतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, रक्तप्रवाह सुरळीत राहतो परिणामी हृदयासंबंधी आजार दूर राहतात. (हे पण वाचा-आयर्नच्या जास्त प्रमाणामुळे फुप्फुसांच्या आजारांचे व्हाल शिकार, वेळीच व्हा सावध)