स्वाईनमुळे मुंबई बाहेरील एकाचा मृत्यू
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:34+5:302015-02-14T23:51:34+5:30

स्वाईनमुळे मुंबई बाहेरील एकाचा मृत्यू
>- मुंबईत स्वाईनचे आढळले ७ नवे रुग्णमुंबई : मुंबईत शनिवारी स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण आढळले असून मुंबई बाहेरून मुंबईत उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील स्वाईनच्या रुग्णांची संख्या ८० असून मुंबई बाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या ३८ इतकी आहे. ठाण्याच्या ३० वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या आठवर गेली आहे.३१ जानेवारी पासून ठाणे परिसरात राहणार्या ३० वर्षीय महिलेत स्वाईन फ्लूची लक्षणे दिसून येत होती. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या महिलेला त्रास जाणवू लागल्याने तिला प्लॅटिनम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिची प्रकृती खालावल्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी तिला सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिला न्युमोनियाची लागण झाली. त्यातच तिची प्रकृती खालावल्याने शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर प्रदेश येथून ४७ वर्षीय पुरुषास स्वाईन फ्लूची लागण झाल्यामुळे उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. तर, गुजरातमधील ३२ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ५ आणि १७ वर्षाची दोन मुले आहेत. अंधेरी पूर्व येथे राहणार्या ५ वर्षीय मुलाला स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्याच्यावर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. चर्नी रोड येथील १७ वर्षीय मुलावरही बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. दादरच्या ५५ वर्षीय महिलेला, जुहूच्या ३६ वर्षीय महिलेला, माहिमच्या ५९ वर्षीय पुरूषास. कुर्ल्याच्या ५६ वर्षीय पुरूषास आणि पवईच्या ३३ वर्षीय पुरूषास स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्व रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.