Dance With Me, I Am Single - विराट कोहली
By Admin | Updated: February 9, 2016 13:19 IST2016-02-09T13:13:12+5:302016-02-09T13:19:07+5:30
दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे हॉट कपल विभक्त झाल्याची अफवा, ही अफवा नसून वास्तव असल्याचे वृत्त आहे

Dance With Me, I Am Single - विराट कोहली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे हॉट कपल विभक्त झाल्याची अफवा, ही अफवा नसून वास्तव असल्याचे वृत्त आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, विराटने अनुष्काला टि्वटरवरून व इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे, तसंच त्याने ह्रदयभंग असं शीर्षक असलेला स्वत:चा फोटो शेअर केला.
शनिवारच्या एका पार्टीमध्ये विराटने डान्स फ्लोअरवर मी सिंगल आहे, या माझ्याबरोबर डान्स करा असे मित्र मैत्रिणींना सांगत एकप्रकारे त्याचे व अनुष्काचे संबंध संपल्याचेच सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दोघांच्या जवळच्या मित्रमंडळीच्या सांगण्यानुसार अनुष्काने स्वत:ला कामामध्ये बुडवून घेतलं आहे. विशेष म्हणजे, जवळपास तीन महिने एकमेकांच्या संपर्कात नसणा-या विराटने श्रीलंका दौ-यातील टी-२० मालिकेत विश्रांती घेतली असून १४ फेब्रुवारीपर्यंत तो सुटीवर आहे. परंतु अनुष्काचे व्यस्त वेळापत्रक पाहुन त्याला धक्का बसला आणि त्यांचे संबंध तुटेपर्यंत ताणले गेले.
दोनच महिन्यांपूर्वी अनुष्काने एका मुलाखतीमध्ये विराटसाठी क्रिकेटच्या सामन्यांना जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मी स्टेडियममध्ये जाऊन त्याचा खेळ बघणं विराटला आवडतं असंही तिनं सांगितलं होतं. त्यामुळे केवळ दोनच महिन्यात असं काय घडलं असा धक्का या जोडीच्या चाहत्यांना बसला आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार विराटने लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु आत्ता करीअर महत्त्वाचं आहे, असं सांगत त्यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला अनुष्कानं दिला होता. याच मुद्यावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असावा असं सांगण्यात येत आहे.