CoronaVirus News: रेमडेसिविरशिवाय ५००० जणांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जाणून घ्या उपचार पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 11:07 AM2021-04-25T11:07:25+5:302021-04-25T12:56:10+5:30

CoronaVirus News: रेमडेसिविर आणि महागड्या औषधांशिवाय रुग्णांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जामखेडमधील शेकडो रुग्णांसाठी ठरले देवमाणूस

CoronaVirus News dr ravi arole who treats patients without remdesivir shares treatment process | CoronaVirus News: रेमडेसिविरशिवाय ५००० जणांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जाणून घ्या उपचार पद्धत

CoronaVirus News: रेमडेसिविरशिवाय ५००० जणांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जाणून घ्या उपचार पद्धत

googlenewsNext

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळून आले. यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत हा आकडा तब्बल साडे तीन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा भासू लागला आहे. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरसाठी धावाधाव करत आहेत. मात्र अहमदनगरमधील डॉ. रवी आरोळे रेमडेसिविरशिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांनी जवळपास ५ हजार रुग्णांना रेमडेसिविरचा वापर न करता कोरोनामुक्त केलं आहे.

ना रेमडेसिविर, ना महागडी औषधे; तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे!

सध्या रेमडेसिविरची प्रचंड चर्चा सुरू आहे. मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काळाबाजार होऊ लागला आहे. रेमडेसिविरशिवाय उपचार शक्य नसल्याचं म्हणत काही रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर आणण्यास सांगत आहेत. तर काही ठिकाणी रुग्णाचे नातेवाईकच रेमडेसिविरचा आग्रह धरत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. रवी आरोळेंशी लोकमतनं संवाद साधला. त्यात त्यांनी रेमडेसिविरशिवाय कोरोना रुग्णांना कसं बरं करता येतं, याबद्दलची उपचारपद्धतच सांगितली.



आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार गंभीर अवस्था असलेल्या ५ टक्के रुग्णांसाठी रेमडेसिविर वापरण्यात यावं. पण एम्सच्या नव्या गाईडलाईन्सनुसार रेमडेसिविर वापरण्याची सक्ती नाही, असं डॉ. आरोळेंनी सांगितलं. 'कोरोनाचा परिणाम फुफ्फुसांवर होतो. फुफ्फुसांना सूज येते. शरीराला ऑक्सिजन कमी पडू लागतो. या दोन गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याआधीही विविध आजारांमुळे फुफ्फुसांना सूज यायची. स्टेरॉईड्समुळे ही सूज कमी करता येते. स्टेरॉईड्स स्वस्त असतात आणि सहज उपलब्धदेखील होतात. त्यामुळे आम्ही सूज कमी करण्यासाठी स्टेरॉईड्स वापरतो. स्टेरॉईड्स किती द्यायचे याचं प्रमाण रुग्णाच्या शरीराच्या वजनावर ठरतं,' अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

ऑक्सिजन कमी पडत असल्यास ऑक्सिजन थेरेपीचा वापर करतो. याशिवाय आम्ही ब्रॉन्कोडायलेटर्स वापरतो. कधी कधी सुरुवातीला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स वापरतो. हे पण सहज उपलब्ध आहे. याशिवाय ते स्वस्तदेखील आहेत. सुरुवातीला स्टेरॉईड्स दिल्यानंतर आम्ही ब्रॉन्कोडायलेटर्सचा वापर करतो. ऑक्सिजन थेरेपी सुरू करतो. अँटिव्हायरल औषधं तर आता सर्रास उपलब्ध होतात. त्यांचा वापर करतो. स्टेरॉईड्स, ऑक्सिजन थेरेपी, ब्रॉन्कोडायलेटर्स, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स या चार गोष्टी मुख्य उपचारांचा भाग आहेत. यानंतरचे उपचार रुग्णामध्ये दिसणाऱ्या लक्षणांवर अवलंबून असतात. कोणाला डोकेदुखीचा त्रास होतो. कोणाला जुलाब होतात. या लक्षणांनुसार मग प्रत्येकाला उपचार दिले जातात, अशा शब्दांत डॉक्टरांनी रेमडेसिविरशिवाय रुग्णांना कोरोनामुक्त कसं करता येतं, याबद्दल सविस्तर माहिती दिली.

Web Title: CoronaVirus News dr ravi arole who treats patients without remdesivir shares treatment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.