चिनी मधाने ब्रिटिशांचे पोट सुटले !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 06:37 AM2022-01-06T06:37:07+5:302022-01-06T06:37:22+5:30

‘हनी लाँड्रिंग’चा प्रकार तुम्ही कधी ऐकलाय? ‘हनी या शब्दावरून वेगळाच अंदाज बांधू नका. ‘हनी’ म्हणजे आपला शुद्ध मध.

Chinese honey escapes British stomach! | चिनी मधाने ब्रिटिशांचे पोट सुटले !

चिनी मधाने ब्रिटिशांचे पोट सुटले !

Next

मनी लाँड्रिंगचा प्रकार आपल्यासाठी नवीन नाही. संपूर्ण जगभरात कुठल्या ना कुठल्या कारणाने हा प्रकार गाजतच असतो; पण ‘हनी लाँड्रिंग’चा प्रकार तुम्ही कधी ऐकलाय? ‘हनी या शब्दावरून वेगळाच अंदाज बांधू नका. ‘हनी’ म्हणजे आपला शुद्ध मध. मधाचे आरोग्यदायी उपयोग आपल्या साऱ्यांनाच माहीत आहेत. आयुर्वेदात तर मधाचे आगळेच महत्त्व वर्णन केलेले आहे आणि अनेक औषधांत मधाचा मोठ्या प्रमाणात वापरही केला जातो. अनेक जण तर साखरेला आरोग्यदायी पर्याय म्हणूनही मधाकडे पाहतात; पण शुद्ध, कुठलीही भेसळ नसलेला मध आपल्याला कुठे मिळेल याचा शोध नागरिक नेहमीच घेत असतात. तोच प्रश्न आता ब्रिटनला पडला आहे. कारण बनावट मधामुळे तेथील लाखो लोकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. त्यात हा प्रश्न  चीनमुळेच निर्माण झाला आहे. चीनमधून मोठ्या प्रमाणात बनावट मध ब्रिटनमध्ये पाठवला जात आहे. अर्थातच हा मध नैसर्गिक नाही. हा मध तयार करण्यात आलेला आहे मक्यापासून आणि तोच ‘असली’ मध म्हणून ब्रिटनमध्ये विकला जात आहे. चीनमधल्या अनेक कंपन्या या बनावटगिरीत सामील आहेत. केवळ ब्रिटनच नव्हे, तर जगातल्या इतर देशांतही हा मध विकला जात आहे.

ब्रिटनमधील ‘हॅप’ या एजन्सीने केलेल्या पाहणीत चीनचे हे बिंग फुटले आहे. ‘हॅप’ ही एजन्सी ब्रिटनमधील खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी आणि बनावटगिरीला आळा घालण्याचे काम करते. या एजन्सीने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात या गोष्टीचा खुलासा करताना म्हटले आहे, चीनचा हा बनावट मध शुद्ध मधासारखाच दिसतो; पण तो मक्यातील साखरेपासून तयार केलेला असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंत्राद्वारे केलेल्या तपासणीत ही लबाडी ओळखू येत नाही, त्यामुळे ब्रिटनमधील अनेक दुकानदार, मॉल्स, सुपर मार्केटवाले हा मध चीनमधून आयात करतात. ब्रिटनमधील जवळपास प्रत्येक दुकानात आणि सुपर मार्केटमधील शेल्फवर हा नकली मध विराजमान असतो आणि मोठ्या प्रमाणात तो विकलाही जातो. कारण या मधाची मोठ्या प्रमाणात केली जाणारी जाहिरातबाजी आणि इतर मधांच्या तुलनेत अत्यंत स्वस्त असलेला हा मध, यामुळे लोक हातोहात त्याची खरेदी करतात.

चीनमधून ब्रिटनमध्ये येणाऱ्या या मधाचा दर्जा तपासण्यासाठी ‘हॅप’ या एजन्सीने चीनमधील या मधाच्या १३ ब्रँडच्या तब्बल २४० चाचण्या केल्या; पण त्यातील एकाही चाचणीत हा मध पास होऊ शकला नाही. आरोग्याबाबत जागरूक असलेले ब्रिटनचे बहुतांश नागरिक आता साखरेऐवजी मधाचा वापर करतात; पण हा बनावट मध खाऊन तेथील नागरिक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत, हे सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनमधील हा मध ‘बनावट’ असूनही ब्रिटनमध्ये त्याच्या आयातीवर कुठलाही निर्बंध नाही. मात्र, ब्रिटनचे नागरिकही त्याबाबत जागरूक होत असून, याविरुद्ध त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. ज्या कारणानं त्यांनी साखरेऐवजी मधाचा वापर सुरू केला, ते कारणच फोल ठरल्याने नागरिकही चिंतेत आहेत. चिनी मधाच्या आयातीवर बंदी घालावी अशी मागणी आता नागरिकांनी सुरू केली आहे. त्याला उत्स्फूर्त पाठिंबाही मिळतो आहे. ब्रिटनमध्ये मधाचा वापर किती असावा ब्रिटनमधील लोक वर्षाला तब्बल ५० हजार टनापेक्षाही अधिक मध फस्त करतात.  त्यात चीनमधून आयात केलेल्या मधाचे प्रमाण तब्बल ८६ टक्के आहे.

चीनबरोबरच युरोपातूनही ब्रिटनमध्ये मधाची आयात केली जाते. काही स्थानिक कंपन्याही मधाची निर्मिती करतात. या साऱ्या मधाचं प्रमाण आधी मोठ्या प्रमाणात होते; पण चीनच्या मधाने जशी ब्रिटनच्या मार्केटमध्ये घुसखोरी केली, तशी इतर मध उत्पादकांची मार्केटमधून जणू काही हकालपट्टी झाली. कारण नैसर्गिक मधाप्रमाणे दिसणाऱ्या आणि अतिशय माफक किमतीत मिळणाऱ्या या मधाने अल्पावधीतच ग्राहकांना आपल्याकडे खेचले. त्यामुळे युरोपातून होणारी आयात तर घटलीच, पण स्थानिक मध निर्मात्या कंपन्याही अक्षरश: रस्त्यावर आल्या. त्यातील काही कंपन्या तर ग्राहकांअभावी बंदही पडल्या. या चिनी मधाची आयात अशीच वाढत राहिली आणि नागिरकांकडूनही त्याचे सेवन होत राहिले, तर ब्रिटनमधील नागरिक लठ्ठपणाची शिकार व्हायला वेळ लागणार नाही, असा सावधानतेचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यासाठी सरकारचे कानही त्यांनी टोचले आहेत.

लाखो कामगार बेकार
ब्रिटनमध्ये मधमाशा संगोपनाचे काम करणाऱ्या आणि त्याद्वारे मध निर्माण करणाऱ्या उद्योगालाही याचा खूप मोठा फटका बसला आहे. ब्रिटनमध्ये मधाचा वापर वाढल्याबरोबर या उद्योगालाही मोठी चालना मिळाली होती. अनेकांनी या उद्योगात गुंतवणूक केली होती; पण हा उद्योगच आता डबघाईला आल्यामुळे लाखो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. स्थानिकांना बेकार करून बनावट मधाच्या आयातीला सरकार प्रोत्साहन देत असेल, तर ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा या उद्योजकांनीही दिला आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारीही त्यांनी केली आहे.

Web Title: Chinese honey escapes British stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.