जगातील अनेक भागांमध्ये चिकनगुनिया विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. वाढत्या प्रकरणांमुळे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (CDC)अनेक देशांसाठी प्रवास इशारा (ट्रॅव्हल अलर्ट) जारी केला आहे. विशेषतः चीनमध्ये या विषाणूचा सर्वाधिक उद्रेक झाला असून, तेथे ७,००० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
एशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये या वर्षी चिकनगुनियाचे सुमारे २.४ लाख रुग्ण नोंदवले गेले आहेत, ज्यात ९० लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगडोंग प्रांतात जून २०२५ पासून ७,००० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हाँगकाँगमध्येही २०१९ नंतर पहिला रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.
या वाढत्या संसर्गामुळे, CDCने लेव्हल-२ प्रवास आरोग्य सूचना (travel health notice) जारी केली आहे, ज्यामध्ये प्रवाशांना अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे. यामध्ये चीन, बोलिव्हिया, श्रीलंका, मादागास्कर यांसारख्या देशांचा समावेश आहे. तसेच, भारत, ब्राझील, मेक्सिको, पाकिस्तान यांसारख्या देशांना भेट देणाऱ्या अमेरिकन प्रवाशांसाठीही CDCने विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकेमध्ये चिकनगुनियाचा संसर्ग सामान्यतः प्रवासातून परतलेल्या लोकांमध्ये आढळतो. CDCच्या माहितीनुसार, २००६ ते २०१३ दरम्यान दरवर्षी सरासरी २८ लोकांना या विषाणूची लागण झाली. २०२४ मध्ये १९९ आणि २०२५ मध्ये आतापर्यंत ४६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. CDCने सांगितले की, २०१९ नंतर अमेरिकेत स्थानिक पातळीवर संसर्ग झाल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही, ज्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
चिकनगुनियावर उपचार आणि प्रतिबंधयावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही, त्यामुळे डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे हाच मुख्य उपाय आहे. पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, डास प्रतिबंधक औषधांचा वापर करणे आणि पाणी साठलेल्या ठिकाणी डासांची पैदास होऊ न देणे आवश्यक आहे.