कॅन्सरग्रस्त बहिणीसाठी भावाचे साकडे
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:30+5:302015-08-31T00:24:30+5:30

कॅन्सरग्रस्त बहिणीसाठी भावाचे साकडे
>पुणे: वडिलांचे छत्र हरपलेले, घरची हलाखीची परिस्थिती, डोक्यावर साधे छप्पर नाही, आई कबाड कष्ट करते अशाच परिस्थितीत बहिणीला ११ व्या वर्षी ब्लड कॅन्सर झाल्याने स्वप्नील जाधव या तीच्या भावाने तिला रक्षाबंधनाच्या दिवशी मदतीचा हात दिला आहे. साखळीपर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर या मंडळाच्या गणपतीच्या हातात राखी बांधून बहिणीला बरे वाटावे यासाठी हा भाऊ गणपती जवळ प्रार्थना केली. मंडळाच्या वतीने स्वप्नीलला त्यांच्या बहिणीच्या इलाजासाठी सहा हजार रोख रक्कम देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि नगरसेवक रविंद्र माळवदकर, भाई कात्रे, सागर नलावडे, अनिल काळे आदी उपस्थितीत होते.या चिमुकल्या बहिणीसाठी तिचा फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणारा भाऊ आणि तिची आई बरेच प्रयत्न करत आहेत. समाजाकडून मदतीचा हात मिळाल्यास तिच्यावर योग्य ते उपचार होऊन ती लवकर बरी व्हावी अशी जाधव कुटुंबियांची अपेक्षा आहे. अनेक व्यक्ती व संघटना यांनी आपापल्या परिने यासाठी मदतीचे हात पुढे केले आहेत. भावा-बहिणीच्या नात्याचा हा अतूट धागा कायम रहावा यासाठी साक्षीचा भाऊ स्वप्निल आपल्या बहीणीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. सध्या तिच्यावर कमांड हॉस्पिटलवर उपचार चालू असून दर महिन्याला तीचा बोनमॅरोचा खर्च करावा लागतो. तसेच औषधोपचारासाठीही मोठा खर्च येत असून तो परवडत नसल्याने उपचार थांबवले होते. परंतु मदत मिळाल्यास हा खर्च करणे शक्य होणार असल्याचे स्वप्निलने लोकमतशी बोलताना सांगितले. चौकटसाक्षीच्या आजारावरील पुढील उपचार चालू ठेवणे आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रयत्न करणे हीच तीला खरी ओवाळणी आहे.स्वप्निल जाधव, साक्षीचा भाऊ