मुंबई : गेल्या काही वर्षात नवजात बाळांना बाटलीतून दूध पाजण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. आईचे दूध थेट देण्याऐवजी बाहेरचे दूध बाटलीतून पाजण्याची प्रथा अनेक पालकांमध्ये पाहायला मिळते. मात्र, ही सवय बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, पहिल्या सहा महिन्यांत बाळाला केवळ स्तनपानच करावे. आईच्या दुधात बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक सर्व पोषकद्रव्ये, अँटीबॉडीज आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनसंस्था बळकट होते आणि एकूणच बाळ सुदृढ राहते.
आईचे दूध म्हणजे अमृत
आईचे दूध हे बाळासाठी अमृततुल्य आहे. त्यामुळे नवजात बाळाला बाहेरचे दूध देण्याऐवजी केवळ स्तनपान करणेच सुरक्षित, पोषक आणि आरोग्यदायी आहे, हे प्रत्येक आईने लक्षात ठेवले पाहिजे.
जागतिक स्तनपान सप्ताहात जनजागृती
अलीकडेच साजऱ्या झालेल्या जागतिक स्तनपान सप्ताहात स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी विविध वैद्यकीय आणि सामाजिक संस्थांनी महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे, कार्यशाळा आणि व्याख्याने आयोजित केली होती. स्तनपानाची योग्य पद्धत, काळजी घेण्याचे नियम याबाबत महिलांना माहिती देण्यात आली.
बाहेरच्या दुधाचे दुष्परिणाम
बाटलीतून दूध पाजल्यास बाळाला विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः पोट बिघडणे, जुलाब होणे, संसर्ग होणे यासारख्या त्रासांची शक्यता वाढते. शिवाय, बाटलीतून दूध पाजण्याच्या सवयीमुळे बाळ आईचे दूध पिणे टाळू शकते आणि त्याच्या पोषणावर थेट परिणाम होतो. काही प्रकरणांमध्ये दात किडण्याचाही धोका दिसून आला आहे.
बाळासाठी स्तनपान हा सर्वोत्तम आहार आहे. नवजात बाळाची पचनसंस्था नाजूक असते. आईचे दूधच त्यासाठी योग्य असून, त्यातून बाळाला आवश्यक जीवनसत्त्वे, प्रथिने मिळतात - डॉ. आरती अढे-रोजेकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, हिंदुजा रुग्णालय