गोंदिया : तालुक्यातील ग्राम बनाथर येथून ३० बकऱ्यांची चोरी करून विक्री केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा संशयित आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम बनाथर येथील मिलिंद भारत नागदेवे यांच्या शेतशिवारातील गोट फार्ममधून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या ३० बकऱ्या चोरीला केल्याची घटना घडली हाेती. १४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या चोरीच्या प्रकरणात रावणवाडी पोलिसांत भादंविच्या कलम ३८०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. रावणवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून शहरातील छोटा गोंदिया परिसरातील अमोल उमराव कोल्हाटकर (२९), स्वामी लिलाधर बाहे (३२) व दुर्गेश ऊर्फ बालू लीलाधर दाते (३०) या संशयितांना अटक केली होती. या तिघांनी बकऱ्या चोरी करून विकल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १० हजार रुपये तसेच चोरीसाठी वापरलेले दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त केले आहे. न्यायालयाने या तिघांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.