गोंदिया : शेतकरी सभेत बच्चू कडू हे शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयावर बोलत असताना स्टेजच्या बाजुला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्या. यावर बच्चू कडू यांनी मध्येच भाषण थांबवित टाळ्या वाजविणाऱ्या कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत एक असे कडू यांनी बजाविताच सभास्थळी काही क्षण गंभीर वातावरण निर्माण झाले होते.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे शुक्रवारी (दि.५) शेतकरी हक्क यात्रेसाठी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आमगाव तालुक्यातील ठाणा येथे शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान बच्चू कडू परभणी येथील सचिन जाधव या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या अत्यंत संवेदनशिल विषयावर भाष्य करीत होते. हे भाष्य करीत असताना स्टेजच्या बाजुला बसलेल्या कार्यकर्त्याने टाळ्या वाजविल्या. यावर बच्चू कडू यांनी हा काय टाळ्या वाजविण्याचा विषय आहे काय असे बजावित कार्यकर्त्याला स्टेजवरुनच चांगले खडसावले. या सभेत बच्चू कडू यांनी सरकारवर तोफ डागली. सरकार शेतमालाला
हमीभाव देत नाही, बोनस व चुकाऱ्याचे पैसे वेळेवर शेतकऱ्यांना देत नाहीत. हे राज्यातील महायुती सरकार हे शेतकरी हितेशी नसल्याचा आरोप केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अशा सरकारला आता शेतकऱ्यांनीच धडा शिकावावा असे सांगितले.
२८ सप्टेंबरला मोठे आंदोलन करणार
राज्यातील महायुती सरकार दिव्यांगाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. मात्र आपण दिव्यांग बांधवांवर अन्याय होवू देणार नाही. दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी २८ सप्टेंबरला मोठे आंदोलन करण्याचा इशारा माजी आ. बच्चू कडू यांनी दिला.
त्या प्रश्नावर बच्चू कडू चिडले
माजी आ. बच्चू कडू यांना माध्यम प्रतिनिधींनी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष असताना दिव्यांगांचे प्रश्न का सोडविले नाही असा प्रश्न केला असता या प्रश्नावर बच्चू कडू चांगलेच चिडले. पुढे सावरत त्यांनी मी एकटाच आमदार हा प्रश्न लावूृन धरणारा होतो. त्यामुळेमाझ्या एकट्याच्या मनासारख कस होणार असे ते म्हणाले.