लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : खेड्यापाड्यात व वाड्यावस्त्यांवर असलेल्या शाळेतील हजारो मुलांचे पोट भरणाऱ्या शालेय पोषण आहार करणाऱ्या महिला कर्मचारी मागील सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. या महिला कर्मचारी आक्रमक झाल्या असून, येत्या काही दिवसांत आंदोलन करण्याचा इशाराही त्या महिलांनी 'लोकमत'शी बोलताना दिला.
गोंदिया जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंत मुलांना केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार दिला होता. हा आहार बनविण्यासाठी प्रत्येक शाळेत एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला गरीब, वर्गातील आहेत. कष्टकरी या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. वेळेवर मानधन मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या असून, त्यांनी जगायचे कसे हा मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
या आहेत मागण्या...
- महिला कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळावे
- करारपत्र लिहून घेणे बंद करावे
- प्रत्येक शाळेत सहीचे रजिस्टर ठेवावे
- महिना किमान २० हजार मानधन द्यावे
- दिवाळीला बोनस देण्यात यावा
- दोन साड्या गणवेश म्हणून देण्यात यावा
शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन शालेय पोषण आहार वाटप कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून निदर्शने केली होती. सहा महिन्यांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे या मागणीचे निवेदन पोषण आहार महिला कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.
"शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मागील वर्षभरापासून मानधन वेळेवर मिळत नाही. त्यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांना भेटून चर्चा केली त्यानंतर निवेदन दिले. शिक्षणाधिकारी यांनी तातडीने शालेय शिक्षण विभागाला कळविले आहे."- हौसलाल रहांगडाले, उपाध्यक्ष भाकप.