गोंदिया : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले असून संक्रमित रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. संक्रमितांची आकडेवारी एवढी मोठी आहे की, प्रत्येकाला बाहेरील विलगीकरणगृहात ठेवणे शक्य नाही. अशावेळी संक्रमित रुग्णांना स्वत:च्या घरीच विलगीकरणात राहण्याची मुभा प्रशासनामार्फत दिली गेलेली आहे. मात्र गृहविलगीकरणात असलेले अनेक रुग्ण नियमांचे उल्लघंन करून बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.
हे रुग्ण इतरामध्येही संसर्ग करीत स्वत:सह दुसऱ्यांच्या जीवास धोका निर्माण करीत आहे. तेव्हा अशा रुग्णांवर ‘वाॅच कुणाचा’ असा संतापजनक सवाल शहरवासीयांनी प्रशासनाला केला आहे. विशेष म्हणजे अशा गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती आहे. १४ दिवसांचे निर्बंध यांच्या बुद्धिमत्तेपलीकडचे काम त्यांना वाटत असते. त्यामुळे अवधे चार ते पाच दिवसच घरी राहून त्यानंतर ते बाहेर सर्रासपणे मुक्त संचार करीत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटेदरम्यान संक्रमित रुग्णांचे संपूर्ण घरच सील होत होते. त्यामुळे या घरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती शेजाऱ्यांसह इतरांना मिळायची व ते संक्रमित रुग्णांपासून तसेच त्यांच्या घरच्या मंडळीपासून दूर रहायचे. पहिल्या लाटेमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने प्रशासकीय यंत्रणासुद्धा प्रत्येक रुग्णावर नजर ठेवून असायची. त्यामुळे रुग्णांना घराबाहेर भटकतासुद्धा येत नव्हते. मात्र दुसऱ्या लाटेत स्थिती भयावह झाली आहे. घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासकीय यंत्रणेतसुद्धा कोरोनाचा फैलाव झाल्याने यंत्रणा कमी पडू लागली आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर अपुऱ्या प्रशासकीय यंत्रणेमुळे लक्ष ठेवायला कुणीही नसल्यामुळे अशा रुग्णांवर उचित कारवाई होत नाही. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा काही दिमाखदार रुग्ण घेताना दिसून येत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढून जनतेसह प्रशासनालासुद्धा बिकट परिस्थतीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉक्स
नगरसेवक व ग्रा.पं.सदस्यांनी ठेवावा वॉच
शहरात नगरसेवक तथा ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वॉर्डातील अशा बेजाबबदार संक्रमित गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर वॉच ठेवावा, असा सल्ला तज्ज्ञ मंडळींनी दिलेला आहे. असे रुग्ण १४ दिवसांच्या गृहविलगीकरण कालावधीत बेजबाबदारपणे घराबाहेर निघून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करीत असल्याचे दिसून आल्यास त्वरित प्रशासकीय यंत्रणेला अवगत करावे, अशी मागणीही सुज्ञ नागरिक करीत आहे.