लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बहुतांश रेल्वेगाड्या रुळावर आल्या. परंतु, प्रवासी सेवा देताना दिल्या जाणाऱ्या सवलतींना रेल्वे अद्यापही ग्रीन सिग्नल दिला नाही. तिकीट दर आणि मासिक पासची सुविधा अजूनही पूर्ववत करण्यात आली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. गोंदिया ते नागपूर आणि नागपूर ते गोंदिया या मार्गावरील हजारो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. परंतु, दिवसभरातून केवळ एकच पॅसेंजर धावत आहे. एक्स्प्रेस गाड्या लहान स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. मागील दीड वर्षात रेल्वेने विशेष रेल्वेच्या नावाने प्रवाशांचा खिशाला मोठी कात्री लावली. सामान्य दरापेक्षा किमान पन्नास रुपये अधिकचे घेऊन विशेष रेल्वे या नावाने कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकडून पैसे उकळले. या उलट ज्या सवलती सामान्य प्रवाशांना द्यायला हव्या होत्या त्या दिल्याच नाहीत. उलट सर्वांनाच समान तिकीट आकारणी केली. आता मात्र, रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जा काढून सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरु केल्या. पण पॅसेंजर रेल्वेगाड्यांना अद्यापही वेटिंगवरच ठेवण्यात आले आहे.
एकाच पॅसेंजरमुळे अडचण - गोंदिया-नागपूर मार्गावर केवळ एकच पॅसेंजर रेल्वेगाडी सुरु केल्याने प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत. विशेष म्हणजे, पॅसेंजरने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने इतवारी-रायपूर ही रेल्वे गाडीदेखील सुरु होणे गरजेचे आहे. आरक्षणाची अट अजूनही कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य तिकीटांची विक्री अजूनही बंदच आहे. परिणामी प्रवाशांना आरक्षित तिकिटांची खरेदी करावीच लागत आहे.
जनरलचा डब्बा लागणार केव्हा?- रेल्वे पूर्वीप्रमाणे सेवा देणार असल्याचे सांगण्यात येत असताना अद्यापही एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करणे शक्य नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन सामान्य प्रवाशांना सोयीचे होईल, असे पूर्ववत तिकीटदर आणि मासिक पासची सुविधा त्वरित सुरू करावी. सद्यस्थितीत धावतात ४६ रेल्वेगाड्या - गोंदिया ते नागपूरदरम्यान सुपरफास्ट, एक्स्प्रेस, पॅसेंजर अशा ४६ रेल्वेगाड्या सद्यस्थितीत धावत आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना या रेल्वे गाड्यांचा लाभ मिळत नाही. यापैकी केवळ नऊ एक्स्प्रेस रेल्वेगाड्या या दररोज धावत असून त्यापैकी चार रेल्वेगाड्या या इतवारी स्थानकापर्यंतच प्रवास करतात. गोंदिया ते इतवारी दरम्यान दिवसभरातून केवळ एकच पॅसेंजर रेल्वेगाडीची सेवा देण्यात येत आहे.