गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्यसेवेत अग्रेसर असलेल्या ६७ रुग्णवाहिकांची आज (दि.९)पासून चाके थांबली आहेत. जिल्हा परिषद, गोंदियांतर्गत येणाऱ्या ६७ रुग्णवाहिका वाहनचालकांची समस्या वाढतच चालल्याने शुक्रवारपासून (दि.९) कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे कोरोनाचा कहर व इतर आजारांच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाही.
कोरोनासारख्या महामारीत वाहनचालक आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोविड सेंटरमधून जिल्हा रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची ने-आण करीत असतात. वाहनचालकांना कोविड भत्ता शासनाकडून देण्यात आलेला आहे; परंतु वाहनचालकांना अद्यापही वितरित करण्यात आला नाही. जे कर्मचारी कोविड-१९ च्या संबंधात येत नाही त्यांना कोविड-१९ चा भत्ता देण्यात आला आहे. जे कर्मचारी कार्यालयामध्ये मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करून व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून संगणक चालवितात किंवा इतर काही कामे करतात, अशा व्यक्तींना कोविड-१९ चा भत्ता देण्यात आला आहे; परंतु जे कोविड रुग्णांची ने- आण करतात त्यांना या भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात वाहनचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेतली; परंतु त्यांना हा लाभ दिला नाही. १३ मार्च रोजी खा. सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत वाहनचालकांचा विषय काढला होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनचालकांना कोविडचा भत्ता ३ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा करतो, असे सांगितले होते. सर्व वाहनचालकांकडून बँक खात्याची माहिती मागितली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण ६७ रुग्णवाहिकाचालकांनी ९ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्णवाहिकाचालकांचा संप सुरू झाल्याने समस्या बिकट होत आहे.