सालेकसा : तालुक्यातील आदिवासी समाजाचे पवित्र धार्मिक स्थळ व ‘क’ श्रेणीचे पर्यटनस्थळ असलेल्या कचारगड येथील विकास कामांसाठी आदिवासी विकास विभागाअंतर्गत ३ कोटी ४९ लाखांची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. भक्त निवासासाठी ३ कोटी, धनेगावात सामाजिक निवासगृहासाठी २९.६२ लाख, बस थांब्यासाठी १९.९० लाख रुपयांचे प्राथमिक अंदाजपत्रक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले आहे.मोठ्या गुफेत संरक्षित भिंत बांधणे व आतील भागात दगड कोसळल्यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी १८ लाख ५८ हजार ५०० रुपये, योजन/ महाप्रकाशसाठी किचन शेड बांधणे ९९.९४.५०० लाख, पानघाटसाठी सरंक्षित भिंत बांधणे ३८,७४,२०० रुपयाचे बांधकामासाठी मंजूरी पत्रक पाठविण्यात आलेले आहे. या कामाना मंजुरी मिळाली की त्वरीत नियमाप्रमाणे प्रक्रिया करून कामाला सुरूवात करण्यात येईल. शासनाकडून त्वरीत मंजूरी मिळावी यासाठी आ. संजय पुराम, शंकरलाल मडावी, महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, संतोष पंधरे, बारेलाल वरखडे, सरपंच पुजा वरखडे, मनिष पुसाम, रामेश्वर पंधरे, खा. अशोक नेते प्रयत्नशील आहेत. गुफेपर्यंत सिमेंट क्रांकीटच्या रस्ता व पायऱ्याचे बांधकाम १.३३ कोटी रुपयातून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या पर्यटन विकास सन २०१३-१४ अंतर्गत १.३३ कोटी रुपयांच्या बांधकाम प्राथमिक मान्यता मिळालेली आहे. सन २०१३-१४ मध्ये जिल्हाधिकारी यांच्या ७०.०० लक्ष एवढी निधी मंजूर झालेला होता. परंतु मंजुरी अभावी कामाची निविदा व कंत्राट निश्चिती न झाल्यामुळे सदर निधी जिल्हाधिकारी यांना परत गेला. सदर कामात सिमेंट रस्ता (३ मी. रूंद पायवाट) व पायऱ्या (२.५ मीटर रूंद) असून १.६० किमी लांब असा रस्ता आहे. या कामास मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक, नागपूरने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार कचारगडची यात्रा संपताच कामाला सुरूवात होणार आहे. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी कचारगडला येऊन ५ कोटीच्या विकास कामाची घोषणा केली होती. त्या अंतर्गत तत्कालीन तहसीलदार शितलकुमार यादव यांनी अधिकाऱ्यांकडून तत्काळ प्रस्ताव बनवून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले होते. त्याच अनुषंगाने मंजुरी मिळून कामाला सुरूवात होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कचारगडला ३.४९ कोटींच्या कामांची प्रतीक्षा
By admin | Updated: February 3, 2015 22:57 IST