गोंदिया : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यास १५ जानेवारीपासून प्रारंभ झाला. यासाठी सुरुवातीला जिल्ह्यातील एकूण तीन केंद्रांवरून लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, आता लसीकरणाचे टार्गेट लवकर पूर्ण करण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे. सोमवारीपासून जिल्ह्यातील एकूण सहा केंद्रावरून फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.
गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन लसीकरण केंद्रे, अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालय, खमारी प्राथमिक आराेग्य केंद्र, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, देवरी ग्रामीण रुग्णालय या लसीकरण केंद्रांवरून फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. कोविड लसीकरणासाठी आतापर्यंत कोविन ॲपवर ४५०० आराेग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना या सहा केंद्रांवरून आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत लसीकरण पूर्ण करण्याचे टार्गेट आरोग्य विभागाने ठेवले आहे. त्याच दृष्टीने नियोजन केले आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण तीन लसीकरण केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. मात्र, लसीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करायची असल्याने लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. मागील आठवड्यात कोरोना लसीकरण मोहिमेत राज्यात जिल्हा सातव्या क्रमांकावर होता. लसीकरणाचे टार्गेट करण्यासाठी आता केंद्र वाढविण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
.......
शुक्रवारी २४० कर्मचाऱ्यांना लस
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, देवरी ग्रामीण रुग्णालय, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात एकूण २४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणाप्रसंगी मेडिकलचे अधीक्षक डॉ. दिलीप गेडाम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर उपस्थित होत्या.
.......
लसीकरणानंतरच सर्वच फिट
जिल्ह्यात आतापर्यंत ८०० कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत एकाही कर्मचाऱ्यांना लसीकरणामुळे त्रास झाल्याच्या तक्रारी नाही. ताप, डोकेदुखी, खाज सुटल्याच्या किरकोळ तक्रारी होत्या. लसीकरण मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आरोग्य कर्मचारी स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत आहेत.