लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १५ गावांना पुराचा वेढा निर्माण झाला होता. यामुळे मागील दोन दिवसांपासून या दोन्ही तालुक्यातील १२०० हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे रोवणी केलेले धान वाहून जाण्याची आणि पाण्यामुळे धान सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात आणि लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तेथील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी गोंदिया तालुक्यातील नदीकाठालगत असलेल्या डांर्गोली, किन्ही, कासा, काटी, ढिवरटोली, बिरसोला, महालगाव आणि तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, मरारटोला, चांदोरी खुर्द, बिहिरीया, गोंडराणी, अर्जुनी, पिपरीया या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. शिवाय धानपिके सुध्दा पाण्याखाली आले होते.वैनगंगा आणि बाघ नदी बुधवारी ही दुथडी भरुन वाहत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतामध्ये पाणी साचून आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच रोवणी केली. पुराच्या पाण्यामुळे ही रोवणी वाहून जाण्याची तसेच बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने ते सडण्याची शक्यता आहे.२००६ नंतर म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. गोंदिया आणि तिरोडा कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून प्राथमिक सर्वेक्षणात गोंदिया तालुक्यातील ७५० तर तिरोडा तालुक्यातील ४५० हेक्टर अशी एकूण १२०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. अद्यापही शेतांमध्ये पाणी भरुन असल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.पंधरा गावे बाधितवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने डांर्गोली, किन्ही, कासा, काटी, ढिवरटोली, बिरसोला,महालगाव आणि कवलेवाडा,मरारटोला,चांदोरी खुर्द, बिहिरीया, गोंडराणी,अर्जुनी, पिपरीया या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या गावामंधील घरांची सुध्दा मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.पाणी भरून असल्याने समस्यानदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहचून सर्वेक्षण करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या अडचण जात आहे.परिणामी नुकसानीचे पंचनामे तयार करुन अहवाल सादर करण्यास तीन चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.दोन महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील चौवीस तासात गोंदिया तालुक्यातील खमारी महसूल मंडळात ६६ मिमी, तर कामठा मंडळात ९९ मि.मी.पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.तर जिल्ह्यात बुधवारी सरासरी ६.११ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
१२०० हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST
वैनगंगा आणि बाघ नदी बुधवारी ही दुथडी भरुन वाहत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतामध्ये पाणी साचून आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच रोवणी केली. पुराच्या पाण्यामुळे ही रोवणी वाहून जाण्याची तसेच बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने ते सडण्याची शक्यता आहे.
१२०० हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली
ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : सर्वेक्षणाचे आदेश, कृषी विभाग लागला कामाला