लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी पकडली असून, त्यातील २१ जनावरांची सुटका केली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम तेढाजवळ पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१० वाजताचे दरम्यान ही कारवाई केली असून, १२.१० लाखांचा माल जप्त केला आहे.
जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी वाहन क्रमांक (एमएच १५, डीके ६७१२) पकडले असता, त्यात १० जनावरांना निदर्यतेने कोंबल्याचे दिसले. तर दुसरे वाहन क्रमांक (एमएच ३६, एए १८४७)मध्ये ११ जनावरांना कोंबल्याचे दिसले. पोलिसांनी दोन लाख १० हजार रूपये किमतीची २१ जनावरे व १० लाख रूपये किमतीची दोन वाहने असा एकूण १२ लाख १० हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम यांच्या तक्रारीवरून कलम ११ (१) (ड) (ई) (फ) (ह) सहकलम ५ (अ) (ब) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.