लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असून अवकाळी पावसाने जिल्ह्यात एंट्री मारली आहे. अशातच २७ आणि २८ तारखेला बरसलेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपीटमुळे जिल्ह्यातील सुमारे ३८३२.१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ७० गावांना अवकाळीने बाधित केले आहे.
उन्हाळा आपल्या रंगात येत असतानाच अचानकच वातावरणाने बदल घेतला असून अवघ्या विदर्भालाच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. यातूनच जिल्ह्यालाही पुढील चार-पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. अशातच रविवारी (दि.२७) व सोमवारी (दि. २८) जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीटने दमदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ७० गावे बाधित झाली असून त्यातील सुमारे ३८३२.१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
तर अवकाळी पावसाचा हा खेळ येथेच संपला नसून मंगळवारीही (दि.२९) दिवसा कडक उन्ह तापल्यानंतर सायंकाळी ढग दाटून वादळी वाऱ्याला सुरुवात झाली होती. यामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असणार यात शंका नाही. एकंदर दमदार पाऊस, वादळवारा व गारपीट झाल्यास मात्र नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सडक-अर्जुनी तालुक्याला फटका२७ व २८ तारखेला बरसलेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपीटचा सर्वाधिक फटका सडक-अर्जुनी तालुक्याला बसल्याचे अहवालातून दिसून येत आहे. कारण, अवकाळी पावसामुळे सडक-अर्जुनी तालुक्यातील ५७ गावे बाधित झाली असून त्यातील ३८२० हेक्टर क्षेत्र व ५७९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तालुक्यातील भात, मका व आंबा पिकाचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.
अवकाळीमुळे जिल्ह्याचा पारा घसरलाजिल्ह्यात उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली असून पारा ४२ अंशावर गेल्याची नोंद घेण्यात आली आहे. असे असतानाच शनिवारी (दि.२६) पारा ४०.९ अंशावर पोहचला होता. मात्र रविवारी (दि.२७) अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पारा घसरून ३७.४ अंशावर आला होता. तर सोमवारी (दि.२८) पारा ३८ अंशावर आला होता. पावसामुळे पारा घसरला असून उकाड्यापासून सुटका मिळाली आहे.
गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व देवरीतही नुकसानअवकाळी पाऊस व गारपीटमुळे सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक कहर झाला असतानाच गोरेगाव तालुक्यातील ७ गावांतील सुमारे ८.८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. २७ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून भात व आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ गावांतील सुमारे २ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. येथे दोन शेतकऱ्यांना फटका बसला असून त्यांचे मका पिकाचे नुकसान झाले आहे. तर देवरी तालुक्यातील ४ गावांतील सुमारे १.३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. येथे सात शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
गोंदियात लावली पावसाने हजेरीदिवसभर कडक उन्ह तापून अंगाला घामाघूम केल्यानंतर मंगळवारी (दि.२९) सायंकाळी ५ वाजता दरम्यान अवकाळी पावसाने गोंदिया शहरात हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. शहरात चांगलाच पाऊस बरसला असतानाच जिल्ह्यातील अन्य भागातही पाऊस अपेक्षित आहे.