खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्याचा भास : हलबीटोल्यात जपताहेत अनोखी परंपरासालेकसा : तालुक्यातील हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा तुळशी विवाह करून आपली अनोखी परंपरा कायम ठेवली. युवकांचा हा अभिनव उपक्रम पंचकोशीत कौतुकाचा विषय झाला आहे. हा म्हणायला तुळशी विवाह असला तरी खऱ्याखुऱ्या विवाह सोहळ्यापेक्षा त्यात काहीही कमी नव्हते. पाहुणे मंडळीना रितसर निमंत्रण, २५०० वऱ्ह्याडांची उपस्थिती, स्वागत कमान, वैदिक मंत्रोपचार, मंगलाष्टके आणि भोजन व्यवस्था अशा थाटात तुळशी आणि शालीग्रामचा हा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी पार पडला. कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेदरम्यान तुळशी विवाहाची प्रथा हिंदू संस्कृतीत आहे. तुळशी विवाहानंतरच घरातील उपवर मुला-मुलींची लग्न जोडण्याची प्रक्रिमा सुरू होते. प्रत्येक घरी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावण्यात येते. परंतु ते लग्नकार्य घरच्या व शेजाऱ्यांकडील मंडळीपर्यंत मर्यादीत असते. अर्धनारेश्वरालय (हलबीटोला) येथील १५ नवयुवकांनी मात्र तुळशी विवाह करण्याची अभिनव परंपरा सुरू केली आहे. यंदा त्यांनी अधिकारी, पदाधिकारी, वर्ग इष्टमित्रांना, विवाह संघटनाना व गावातील अनेक लोकांना सुध्दा आमंत्रित केले. आमंत्रणाला मान देत विविध ठिकाणावरून जवळपास २ हजार ५०० मंडळी आली. या सर्वांचे त्या नवयुवकांनी आपली संस्कृती व लग्न समारंभाचा वारसा जपत स्वागत केले. भेटीगाठी घेतल्या, प्रवेशद्वारावरच सर्वांचे स्वागत करण्यात आले. एकमेकांची ओळख करून देण्यात आली. या सोहळ्यासाठी लग्नमंडप सजविण्यात आला होता. त्यात तुळशी आणि शालीग्रामच्या नावाचे थर्माकोल लावण्यात आले. वर-वधूची जागा निर्धारीत करण्यात आली. लग्नविधी व मंत्रोपचारा विधी पार पाडण्यासाठी लांजी (म.प्र.), ककोडी येथील पं.विश्वनाथ तिवारी आले होते. त्यांनी वैदिक पध्दतीनुसार विधीवत लग्न सोहळा पार पाडला. यावेळी पोपटलाल हटवार व एन.के.डोळस यांनी या विवाहात सोयऱ्याची भूमिका पार पाडली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री अर्धनारेश्वलाय ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदराम वरकडे, उपाध्यक्ष रमेश फरकुंडे, सचिव बाजीराव तरोणे, कोषाधयक्ष दुर्गाप्रसाद साहू, सदस्य पवन पटले, चेतन बिसेन, श्रीणुवई, कोमल टेंभरे, मुनेश्वर कापसे, भरत साहू, संतोष कापसे, सुरेश शेंडे, टोनेंद्र बिसेन, रमेश कापसे, महिला जागृती समिती, ममता कापसे, बिंदेश्वरी बावनथडे, हंसकला शेंडे, रत्नमाला किरसान, द्वारका शेंडे तर युवा शक्ती मंडळाचे लोकेश कोरे, नविन भांडारकर, प्रदीप उईके, शैलेश शेंडे, सुभाष भांडारकर, दामोदर राऊत, कैलाश कापसे, दुर्गेश शेंडे, धर्मशीला उईके, चित्ररेखा तरोणे, आशा नाईक, वैशाली नाईक, लक्ष्मी भांडारकर यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
मंत्रोपचाराने रंगला तुळशी-शालीग्राम लग्नसोहळा
By admin | Updated: November 16, 2016 01:26 IST