वडेगाव (गोंदिया) : तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथून मुलाला दुचाकीने शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने जात असताना झाडावर वीज कोसळून ते झाड दुचाकीवर कोसळल्याने वडील ठार; तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. ७) सकाळी सहा वाजता वडेगाव-बिरसी मार्गावरील सातोना पॉवर हाऊसजवळील टर्निंग पाॅइंटजवळ घडली. जीवचंद यादोरावर बिसेन (४६) असे अपघातात ठार झालेल्या वडिलांचे, तर चिराग बिसेन (१६, रा. वडेगाव) असे अपघातात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, जीवचंद बिसेन हे सोमवारी सकाळी आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३५-एपी ९३७०) वडेगाव येथून मुलगा चिराग याला बिरसी येथे शाळेत सोडण्यासाठी घेऊन जात होते. दरम्यान, सातोना जवळील पाॅवर हाऊसजवळील टर्निंग पॉइंटजवळ झाडावर वीज पडून ते झाड जीवचंद बिसेन यांच्या धावत्या दुचाकीवर पडल्याने जीवचंद बिसेन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा चिराग बिसेन हा यात गंभीर जखमी झाला. चिरागला उजव्या हाताला, पायाला, कमरेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला उपचारासाठी तिरोडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले.
विचित्र अपघातजिल्ह्यात रविवारी (दि. ६) रात्रीपासून पावसाची रिपरिप कायम आहे. तिरोडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. सोमवारी सकाळी या परिसरात विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान जीवचंद बिसेन हे दुचाकीने मुलाला सोडण्यासाठी जात असताना रस्त्यालगतच्या एका झाडावर वीज कोसळली आणि तेच झाड जीवचंद यांच्या दुचाकीवर कोसळल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मुलगा चिराग गंभीर जखमी झाला. जीवचंद बिसेन हे वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांचा या विचित्र अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.