गृहनिर्माण अभियंत्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:29 AM2021-07-29T04:29:02+5:302021-07-29T04:29:02+5:30

गोंदिया : सध्या राज्यात सर्वत्र आवास (घरकुल) योजनेची कामे युद्धस्तरावर राबविण्यात येत असून घरकुलांची कामे अगदी वेळेवर ...

Time of starvation on housing engineers | गृहनिर्माण अभियंत्यांवर उपासमारीची वेळ

गृहनिर्माण अभियंत्यांवर उपासमारीची वेळ

Next

गोंदिया : सध्या राज्यात सर्वत्र आवास (घरकुल) योजनेची कामे युद्धस्तरावर राबविण्यात येत असून घरकुलांची कामे अगदी वेळेवर व्हावी, तसेच या कामांची पारदर्शकता व बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी पं.स. स्तरावर ग्रामीण गृहनिर्माण बांधकाम अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली. परंतु, गोंदिया पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या या बांधकाम अभियंत्यांना मागच्या दहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. अनेकदा मागणी करूनही जिल्हा परिषद उर्वरित मानधन देत नसल्यामुळे ते मिळवून देण्यासाठी आ. विनोद अग्रवाल यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून प्रयत्न करावे, अशी मागणी अभियंत्यांनी त्यांच्याकडे केली.

ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के व हक्काचे घर असावे, असे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी घरकुलबांधणीच्या अनेक योजना शासनातर्फे युद्धस्तरावर राबविण्यात येत आहेत. या योजनेतून ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळत आहे. या घरकुलांच्या बांधकामांवर देखरेखीसाठी पंचायत समितीस्तरावर ग्रामीण गृहनिर्माण बांधकाम अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली. घरकुलाचे ले-आउट देणे, त्यांचे जीओ टॅगिंग करणे, पात्र घरकुल लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, बांधकामांचे टप्पेनिहाय फोटो अपलोड करणे, मौका पडताळणी करून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे, इत्यादी कामे या अभियंत्यांना करावी लागतात. या कामांच्या मोबदल्यात त्यांना प्रतिलाभार्थी कामाच्या टप्पेनिहाय शासनाकडून पारिश्रमिक म्हणून मानधन देण्यात येत असते. या मानधनावरच ते आपला प्रवास व कार्यालयीन खर्च तसेच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काेविडकाळातही त्यांनी इमानेऐतबारे काम करून आपल्या कामाचा ठसा शासनदरबारी उमटविला आहे. परंतु, मागच्या दहा महिन्यांपासून त्यांना ग्रामीण विकास यंत्रणेकडून मानधन न मिळाल्याने या अभियंत्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे. मानधन मिळावे म्हणून अखेर त्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे साकडे घातले आहे. अग्रवाल यांनी हा प्रश्न शासनदरबारी लावून तत्काळ मानधनाचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात आय.जी. कुरेशी, सी.टी. कुंभरे, आर.एस. लंजे, टी.एस. अंजनीकर, डी.एस. निकोले, एस.के. सेबे, व्ही.सी. धावडे, मोहम्मद यासीन शेख, वैभव वैद्य, आर.डी. पिपलेवार, डी.पी. बारेवार, एन.आर. नागपुरे, के.के. पटले, एफ.एस. अहमद, प्रमोद उपवंशी, विशाल टेंभरे, दीपक श्रीवास, व्ही.जी. शेंडे यांचा समावेश होता.

Web Title: Time of starvation on housing engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.